देशपातळीवर अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई परीक्षेसाठीचा प्रश्नसंच इतर राज्यातील माध्यमिक शिक्षण मंडळांना देण्यात यावा, असा प्रस्ताव राज्य बोर्डानी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) दिला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली.
सीबीएसईच्या सल्लागार समितीची बुधवारी दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील शिक्षण मंडळांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. यावर्षीपासून देशभरात अभियांत्रिकी विद्याशाखेच्या प्रवेशासाठी जेईई ही एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. सीबीएसईमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेचा नेमका आवाका आणि स्वरूप कळण्यासाठी देशभरातील विविध राज्यांच्या बोर्डाना प्रश्नसंच देण्यात यावा असा प्रस्ताव राज्यमंडळांकडून ठेवण्यात आला आहे.
देशातील विविध राज्यमंडळांचे बारावीचे अभ्यासक्रम हे एनसीआरटीने तयार केलेल्या आराखडय़ानुसार असले, तरी त्यामध्ये फरक आहे. त्यामुळे राज्य बोर्डातून बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईईचा आवाका समजणे अवघड जाते. त्याचवेळी जेईईची परीक्षा ही बहुतांशी सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार असल्याचे दिसते. जेईईचा नेमका आवाका कळावा यासाठी या परीक्षेला पुरक असे प्रश्नसंच तयार करून राज्य मंडळांना देण्यात यावेत. जेणेकरून राज्य मंडळांमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षेमध्ये स्थान मिळवता येईल, असे राज्यातील परीक्षा मंडळांचे म्हणणे आहे.
सीबीएसईकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर आणि बोर्डाच्या स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणांकन पद्धतीबाबतही चर्चा करण्यात आली. या दोन्ही स्तरावरील गुणांकन पद्धतीमध्ये साधम्र्य आणण्याच्या दृष्टीने सदस्यांनी उपाययोजना सुचवल्या आहेत.