आई-वडिलांनी निवडलेली मुलगी पसंत नसल्यामुळे तिला मारहाण करून अपंगत्व आणण्यासाठी भावी पतीने सुपारी देऊन तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीला मारहाण करताना स्वत: तो उपस्थित होता. त्यानेच मारहाण झाल्याची तक्रार दिली. मात्र, खडकी पोलिसांनी अखेर गुन्ह्य़ाचे गूढ उकलत त्याच्यासह चार जणांस अटक केली आहे.
रोहित संतोष अगरवाल (वय २७, रा. तेली आळी, तळेगाव दाभाडे), रोहित मोहनसिंग कपाडिया (वय ३०, रा. अभिरूची हॉटेलसमोर,पिंपरी), अनिल बाळू कानडे (वय ३५, रा. सुस रस्ता, पाषाण), चाँद गफूर शेख (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, रजनिश देवीसिंग कपाडिया (वय २५, रा. दोघेही- फुलेनगर, भोसरी एमआयडीसी)हा फरार आहे. या घटनेत २३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित याचा या तरूणीशी विवाह ठरला होता. संबंधित तरूणी ही प्राध्यापक आहे. मात्र, ती मुलगी रोहित याला पसंत नसल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. तरीही त्याच्या कुटुंबीयांनी तिच्याशीच विवाह करावा लागेल असे सांगितले. त्यामुळे रोहित याने विवाह मोडण्याचा वेगळाच डाव रचला. स्वत: त्या तरूणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिला मारहाण करून शारीरिकदृष्टय़ा अपंग करायचे असे ठरविले. त्या तरूणीला अपंग केल्यानंतर ठरलेला विवाह मोडून दुसऱ्या मुलीशी विवाह करण्याची इच्छा होती.
रोहित याने ही योजना त्याच्या साथीदारांना सांगितली. त्यासाठी त्यांना दोन लाख रूपये सुपारी देण्याचे कबूल केले. त्यापैकी दीड लाख रुपये दिले. बाकीचे पैसे काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. ठरलेल्या दिवशी रोहित याने तरूणीला रेंजहिल कॉर्नर येथे घेऊन येत असल्याची माहिती दिली. ९ फेब्रुवारी रोजी रोहित हा तरूणीसोबत सिनेमा पाहण्यास गेला. रात्री साडेनऊला जेवण करून दोघेही रेंजहिलच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबले. त्यावेळी आरोपी अनिक कानडे आणि चाँद शेख हे दोघे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी पहिल्यांदा रोहितला किरकोळ मारहाण केली. त्यानंतर हॉकी स्टीक, स्टंप आणि बिअरच्या बाटलीने तरूणीला मारहाण केली. तरूणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वत: रोहित याने खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन खडकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार विभंडिक आणि पोलीस कर्मचारी अशोक शेलार यांनी तपास सुरू केला. रोहितकडे केलेल्या चौकशीत काही गोष्टी संशयास्पद वाटल्यानंतर अधिक कसून तपास केला. त्यानंतर हा सर्व प्रकार रोहित यानेच घडवून आणल्याचे समोर आल्यानंतर तरूणीच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. याप्रकरणी रोहितसह चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.