काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्योराज वाल्मीकी यांच्या एकदिवसीय पिंपरी दौऱ्यात स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीचे दर्शन त्यांना घडले आणि वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या गटबाजीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. ‘प्रोटोकॉल’ कोणी पाळायचा, कसा पाळायचा, यावरून वादंग झाल्यानंतर बरेच बौद्धिक झाले, अनेकांची झाडाझडती घेतली गेली. सर्वानी मिळून त्या शिष्टाचाराची ‘ऐशी-तैशी’ केली असताना एकमेकांवर खापर फोडण्यात आले. त्यामुळेच ‘प्रोटोकॉल’ म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
शहर काँग्रेसमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या गटबाजीने आता कळस गाठला आहे. एकेकाळी शहराचा ‘कारभार’ सांभाळणाऱ्या काँग्रेसची आता पुरती वाट लागली आहे. कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झालेत. राष्ट्रवादीच्या राक्षसी ताकदीपुढे अस्तित्व राहते की नाही, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती पक्षात आहे. नेते लक्ष देत नाहीत, कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, सत्ता असूनही कामे होत नाहीत, या कार्यकर्त्यांच्या व्यथा असून राष्ट्रवादीचे ‘हातात हात व पायात पाय’ असे राजकारण पाहता त्यांच्याशी संगत नको अन् त्यांच्यामागे फरफटही नको, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, त्याकडे कोणाचे लक्ष नाही. स्थानिक नेत्यांमध्ये यादवी माजली आहे. कोणीच कोणाला जुमानत नाही. मंत्र्यांनाही दाद देत नाहीत. आपापल्या जातीतले, मातीतले व अर्थसंबंधातील ‘गॉडफादर’ पाठिशी असल्याने इतरांना हिंग लावून विचारण्यास कोणी तयार नाही. नेत्यांनाही काही सोयर-सुतक नाही. त्यांचे दौरे होतात, भाषणे ठोकली जातात, कामाला लागण्याचे आदेश सुटतात, पेपरला बातम्या येतात आणि पुन्हा ‘जैसे थे’ असेच चक्र सुरू आहे. पक्षाचा जीव किती आणि भांडणे किती. अशात, निवडणुकांच्या चाचपणीसाठी सहप्रभारी शहरात आले व नको ते त्यांच्या दृष्टीस पडले. शिष्टाचार न पाळता कार्यक्रमाचे आयोजन झाले, नेत्यांची नावे गाळली, फोटो टाळले यावरून बरेच रामायण झाले. गटबाजीचा त्रास सहन न झाल्याने महिलाध्यक्षांना भर सभेत रडू कोसळले. शहराध्यक्षांच्या विरोधात पत्रकबाजी झाली. तर, अशा निवेदनांना भीक घालत नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. पदाधिकाऱ्यांची हजेरी घेत वाल्मीकी यांनी कामचुकारांना घरचा रस्ता दाखवण्याचे आदेश शहराध्यक्षांना दिले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘प्रोटोकॉल’ म्हणजे काय रे भाऊ?
स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीचे दर्शन त्यांना घडले आणि वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या गटबाजीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. ‘प्रोटोकॉल’ कोणी पाळायचा, कसा पाळायचा, यावरून वादंग झाल्यानंतर बरेच बौद्धिक झाले.

First published on: 06-11-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protocol means what