चार दशके चित्रपटसृष्टीत राहूनही तपस्वी असलेले.. आपल्या कामाशी प्रामाणिकपणा.. गुणग्राहकता.. ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी उलगडले आणि ‘पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती’ या बाबूजींच्या ‘गीतरामायणा’तील काव्यपंक्तीची प्रचिती मंगळवारी रसिकांना आली.
दिलीपराज प्रकाशनतर्फे वसंत वाळुंजकर यांच्या ‘स्वरश्री बाबूजी’ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीधर फडके यांच्या हस्ते झाले. गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, ज्येष्ठ कवी-गीतकार सुधीर मोघे आणि प्रकाशक राजीव बर्वे या प्रसंगी उपस्थित होते.
खडतर परिस्थिती अनुभवलेल्या बाबूजींनी घरी आलेल्या कुणाला कधी विन्मुख पाठविले नाही. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य झाले नाही. ही उणीव त्यांनी मला अभियंता करून पूर्ण केली. माझ्यावर उत्तम संस्कार केले, अशा आठवणींना उजाळा देताना श्रीधर फडके यांचा कंठ दाटून आला.
‘ऊन-पाऊस’ चित्रपटाचा सहायक म्हणून मी बाबूजींसमवेत काम करण्याची सुरुवात केली. बाबूजींकडून मी जे शिकलो ते माझ्या सांगीतिक आयुष्यात उपयोगी पडले. त्यांनी गायकांना गाणं शिकविणे हा एक उत्सवच असायचा, असे प्रभाकर जोग यांनी सांगितले. उत्स्फूर्तता ही गदिमा आणि बाबूजींची ताकद होती. गीतरामायण हा त्याचा कळस म्हणावा लागेल, असे सुधीर मोघे यांनी सांगितले. कणाकणाने वेचलेले ज्ञान बाबूजींनी आपल्या स्वररचनांतून रसिकांना पसापसाने दिले, असे आनंद माडगूळकर यांनी सांगितले. वसंत वाळुंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
उलगडले अनवट बाबूजी
सुधीर फडके यांच्या स्वरचनांचा मागोवा घेणाऱ्या दृक-श्राव्य कार्यक्रमातून अनवट बाबूजी उलगडले. ‘दर्यावरी नाच करी’ ही पहिली ध्वनिफीत, ‘अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी’ हे मालती पांडे यांच्यासमवेत युगुलगीत, ‘राम रस बरसो रे भाई’, बाबूजींच्या स्वरांतील ‘त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे’, ‘नाचनाचुनि अति मी थकले’, ‘एकाच या जन्मी जणू’ आणि ‘गुरु एक जगी त्राता’ ही गीते पडद्यावर पाहताना रसिकांनीही त्यामध्ये आपला सूर मिसळला. ‘सुवासिनी’ चित्रपटातील भीमसेन जोशी आणि ललिता फडके यांच्या स्वरांतील ‘चंद्रकंस’ रागाची चीज ऐकताना मैफलीचा अनुभव घेतला.