स.प. महाविद्यालयाचे मैदान राजकीय सभांसाठी द्यायचे नाही, असा शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचा जुनाच निर्णय आहे. तसेच, कोणत्याही रहदारीच्या रस्त्यावर सभेला परवानगी द्यायची नाही, ही पोलिसांची भूमिका आहे. तरीसुद्धा राज ठाकरे यांच्या ९ फेब्रुवारीच्या सभेसाठी मनसेतर्फे स.प. महाविद्यालय आणि अलका चित्रपट गृहाजवळील टिळक चौकाचा आग्रह धरला जात आहे.. त्यामुळे सभेच्या ठिकाणासाठी घातला जाणारा घोळ हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट तर नाही ना, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारीला (रविवारी) पुण्यात सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. टोलनाक्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर या सभेत भाष्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, सभा कोठे होणार याबाबत निर्णय झालेला नाही. ही सभा स.प. महाविद्यालयात किंवा टिळक चौकात होणार असल्याचे मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यांनी याच जागेसाठी त्यांनी आग्रह धरला आहे. ही सभा स.प. महाविद्यालयाच्या मदानात होणार असल्याचे फलकही शहरात अनेक ठिकाणी लागले आहेत.
टिळक चौकात सभा घेतल्यास पुण्यातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजणार आहेत. या चौकात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवरील वाहतूक दूर अंतरावरूनच इतरत्र वळवावी लागते. त्यामुळे पुणेकरांना होणारा मनस्ताप पाहता अलीकडच्या काळात या चौकात सभेला परवानगी न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. स.प. महाविद्यालयाची शिक्षण संस्था असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळीची राजकीय सभांना मैदान न देण्याची भूमिकासुद्धा स्पष्ट आहे.. दोन्ही जागांना परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट असतानाही पक्षातर्फे हीच नावे पुढे करण्यात आली आहेत. सभेच्या ठिकाणांना अद्यापही परवानगी न मिळाल्याबाबत आधीच भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे, अजूनही मिळतच आहे. त्यामुळे तर याच ठिकाणांचा मुद्दा लावून धरण्यात येत नाही ना, अशी शंका अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ‘अमूक ठिकाणीच सभा घेऊ असा हट्ट योग्य नाही,’ असे काहींनी सांगितले. मात्र, ही त्या पक्षाची बाब असल्याने जाहीर वक्तव्य करण्यास असमर्थता दर्शवली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
राज ठाकरे सभेचे ठिकाण.. मनसेचा प्रसिद्धीसाठी ‘स्टंट’?
मनसेतर्फे स.प. महाविद्यालय आणि अलका चित्रपट गृहाजवळील टिळक चौकाचा आग्रह धरला जात आहे.. त्यामुळे सभेच्या ठिकाणासाठी घातला जाणारा घोळ हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट तर नाही ना, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
First published on: 07-02-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publicity stunt of raj thackreys speech venue