मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने पुण्यातील खडकी परिसरात राहणार्‍या एका १८ वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामधील २३ वर्षीय आरोपी धमकी देऊन फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

सोहेल शफीक मुलाणी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरात राहणारी १८ वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी सोहेल शफीक मुलाणी हे दोघे साधारणपणे दोन वर्षापासून एकमेकांना ओळखतात. आरोपी हा पीडित तरुणीचा मागील काही दिवसापासुन पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्याच दरम्यान ३१ जानेवारी रोजी पीडित तरुणी पाटील कॉम्प्लेक्स येथील बस स्टॉपवर थांबली असताना सोहेलने तिला जाऊन धमकी दिली.

बस स्टॉपवर उभ्या असणाऱ्या तरुणीला पाहून आरोपी सोहेल हा तिच्याजवळ आला. “तू माझ्याशी का बोलत नाहीस? तुझा नंबर दे,” असं तो म्हणाला. त्यावर या मुलीे मोबाईल देण्यास नकार दिला. तेथून ही तरुणी पुढे जाऊ लागल्यावर तिला आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “मला नंबर नाही दिला तर तुझ्यावर चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकून तुला मारुन टाकेन,” अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली. त्यानंतर आरोपी घटना स्थळावरून पसार झाला. या प्रकरणामध्ये पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू असल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले.