पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत समस्या आहेत.. पाणी, हवा शुद्ध 12pune-2असेल याचीही खात्री देता येईलच असे नाही.. गुळगुळीत छान रस्ते दिसत नाहीत. कचऱ्याचा प्रश्न पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र, तरीही राहण्यासाठी आदर्श अशा ठिकाणांच्या क्रमवारीत मुंबई, दिल्लीला मागे टाकत पुणे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे, असा अहवाल ‘मर्सर’ या संशोधन संस्थेने दिला आहे.
युनायटेड किंग्डममधील (युके) मर्सर ही व्यावसायिक संशोधन करणारी संस्था आहे. ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग रॅंकिंग २०१५’ या पाहणीनुसार पुणे हे राहण्यासाठी आदर्श शहरांमध्ये भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर हैदराबाद आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर बंगळुरू आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या शहरांचा क्रमांक लागतो. जगातील विकसनशील शहरांच्या यादीत या शहरांचा समावेश करण्यात आला होता. पुण्याच्या विकासात वाहनउद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई, दिल्लीपेक्षाही परदेशी संस्था पुण्याकडे वळण्याची शक्यता आहे.
शहरातील राहणीमान, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि सुविधा, हवामान, भौतिक सुविधा, प्रदूषणाची पातळी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, राजकीय आणि सामाजिक वातावरण, गुन्हेगारीचे प्रमाण, राजकीय हिंसाचार, आवश्यक सेवांची उपलब्धता, सुरक्षितता या निकषांनुसार शहरांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकता या शहरांमध्ये वाढलेल्या लोकसंख्येमुळे पिण्याचे पाणी, कचरा आणि स्वच्छतेच्या समस्या, वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 जागतिक पातळीवर मात्र भारतातील एकाही शहराचा क्रमांक शंभराच्या आत नाही. हैदराबाद १३९ व्या क्रमांकावर आहे, तर पुणे १४५ व्या, बंगळुरू १४६ व्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा तुलनेने मागास समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेची राजधानी असलेले कोलंबो हे शहरही भारतातील शहरांपेक्षा राहण्यासाठी आदर्श असल्याचे या क्रमवारीनुसार दिसून येत आहे. जागतिक क्रमवारीत कोलंबो १३२ व्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आशियामध्ये सवरेत्कृष्ट ठरले आहे. आशिया खंडात सिंगापूर हे राहण्यासाठी सर्वात आदर्श ठिकाण ठरले असून जागतिक क्रमवारीत, ते २५ व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रियाची राजधानी असलेले व्हिएन्ना हे शहर जगातील सवरेत्कृष्ट शहर ठरले आहे. बगदाद हे या क्रमवारीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.