पुणे : स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक तरुण पर्वती भागात राहायला आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी संकेतस्थळावर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा संदेश पाहिला होता. या संदेशात संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर व्यावसायिकाने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर व्यावसायिकाला २५ टन तांबे (काॅपर स्कॅप) देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. व्यावसायिकाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. मे महिन्यापर्यंत व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ४८ लाख ७२ हजार रुपये जमा केले.

सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर जहाजाने तांबे पाठवित असल्याचे सांगितले होते. प्रवास खर्चाची बनावट बिले सायबर चोरट्यांनी त्याला पाठविली. जहाजाद्वारे पाठविण्यात येणारा माल न पोहचल्याने व्यावसायिक तरुणाने सायबर चोरट्यांच्य मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यावसायिक महिलेची २५ लाखांची फसवणूक

स्वस्तात कपडे देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिक महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अर्जुन आणि हर्ष मेहता नावाच्या आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक महिलेची आरोपींची ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी महिलेला महिलांचे कपडे स्वस्तात उपलब्ध करुन देतो, असे सांगितले होते. आरोपीना महिलेने रोख स्वरुपात २५ लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी महिलेला कपडे मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ तपास करत आहेत.