आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एकास अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित होता. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




हेही वाचा >>> पुणे: ‘नदीसुधार’च्या कामांचा देखावा; जी-२० परिषदेच्या निमित्ताने कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ
डॉ. विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४, रा प्लाॅट नं.३३६ रानवारा राे हाऊस तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. वासुदेव तायडे यानेआपले खरे नाव लपवून डॉ.विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो सांगत होता.
औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेला डाॅ. विनय देव याने आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांचेकडे संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांना संशय वाटला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत विनय देव याचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लोकांमध्ये वावरत असल्याचीही कबुली त्याने दिली. चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.