पुणे : डॉक्टर्स डेच्या दिवशीच डॉक्टर दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या

घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नीशी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी आरडाओरड केला आणि पत्नीने फोन कट केला, मात्र घरी पोहचल्यानंतर त्याला धक्काच बसला

Pune Doctor Couple
निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर

आज देशभरामध्ये डॉक्टर्स डे साजरा करीत असताना पुण्यातील वानवडी परिसरात राहणार्‍या डॉक्टर पती, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे. निखिल हे पत्नी अंकितासोबत आझाद नगर वानवडी येथे राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती निखिल आणि पत्नी अंकिता शेंडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले होते. हे दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. काल सायंकाळी निखिल घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नी अंकिताशी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी आरडाओरड केला आणि अखेर अंकिताने फोन ठेवून दिला. मात्र निखिल घरी पोहचला तेव्हा त्याला धक्काच बसला. घरात प्रवेश केल्यानंतर निखिलला अंकिता ओढणीच्या सहाय्याने छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

अंकिताने आत्महत्या केल्याने निखिलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मात्र आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल उचलण्याइतका कोणता मोठा वाद या दोघांमध्ये झाला? ते फोनवरुन नक्की कोणत्या कारणावरून भांडत होते, हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असून वाद नक्की कशामुळे झाला याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune doctor couple commits suicide on doctors day svk 88 scsg