राज्यात भाजप आणि शिवसेनेमधील भांडणावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. भाजपने अपयश झाकण्यासाठी मुद्दामून शिवसेनेसोबत लढाई केली. दोन्ही पक्षांमधील ही लढाई लुटूपुटूची असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात काँग्रेससाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. देशभरात सध्या अस्थिरतेचे वातावरण दिसत आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता मिळणार नाही असे भाकित त्यांनी वर्तवले. नरेंद्र मोदींवर टीका करताना चव्हाण म्हणाले, माजी पंतप्रधानांवर मोदींनी केलेली टीका निंदनीय आहे. नोटाबंदीकरुन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला केला. यामुळे देशभरात विविध क्षेत्रांमधील ४० लाख नोकऱ्या गेल्या. यामध्ये तरुण वर्ग नाहक भरडला गेला असा आरोप त्यांनी केला. नोटाबंदीला आता १०० दिवस होतील, त्यानंतरही मोदींनी त्याचा हिशोब दिला नाही. देशातील जनता सरकारसोबत उभी राहिली पण आता सरकारमधील कोणीही यावर बोलण्यास तयार नाही. जनतेल्या दिलेल्या त्रासाबद्दल मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी चव्हाण यांनी केली. किती काळा पैसा उघड झाला हे मोदींनी सांगावे अन्यथा यामध्येही मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही. जे मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पामधून काही निष्पन्न झाले नाही. पुणे महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली असा आरोप त्यांनी केला. भाजपकडून पुण्याचा विकास होणार नाही. त्यांनी विकास आराखड्यात मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार केला आहे. जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी आघाडी झाली असून पुण्यात काँग्रेसला चांगली मत पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune election 2017 prithviraj chavan slams shivsena bjp over fight between alliance
First published on: 15-02-2017 at 18:27 IST