पिंपरी-चिंचवड शहरातील बाप लेकीने युरोप खंडातील सर्वात उंच शिखर असणारे माउंट एलब्रुज सर केले असून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या शिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी असून वयाच्या १२ व्या वर्षी गिरीजा लांडगे आणि तिचे वडील धनाजी लांडगे यांनी माउंट एलब्रुजवर धाडसी आणि यशस्वी चढाई केली आहे. गिरीजा हिने वयाच्या १२ व्या वर्षी शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिलीच मुलगी असल्याचं सांगितलं जात आहे.

माउंट एलब्रूज हे शिखर सर करणं सोपं नसून अत्यंत खडतर परिश्रम घ्यावे लागतात. त्यासाठी, धनाजी आणि गिरीजाने मोठे परिश्रम घेतले आहेत. युरोपातील आणि भारतातील हवामान यात मोठ्या प्रमाणात फरकअसून त्याच्याशी जुळवून घेत या बाप लेकीच्या जोडीने हा पराक्रम करून दाखवला आहे. धनाजी लांडगे म्हणाले की, माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ ते ४० डिग्रीपर्यंत असते. ‘माउंट एल्ब्रुस ‘ सर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, मेहनत आवश्यक असते. गिर्यारोहकांच्या मनाचा अंत पाहणारा पर्वत म्हणून याला ओळखले जाते. प्रचंड थंडी आणि वाऱ्याचे घोंगावणारे झोत अशा वातावरणाचा प्रसंगी सामना करावा लागतो. येथील वातावरण सतत बदलते असते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी करुनच या मोहिमेची निवड करावी लागते.

धनाजी पुढे म्हणाले की, शिखरावर चढाई करणारी गिरीजा महाराष्ट्रातील व भारतातील पहिलीच मुलगी आहे. एकूण १० दिवसांच्या मोहिमेत आम्ही दोघांनी वातावरणाशी समतोल राखण्यासाठी २२ ते २५ तारखेपर्यंत ३१०० मीटर, ३८०० मीटर आणि मग ४८०० मीटर उंचीवर सराव केला. त्यानंतर, २६ तारखेला पहाटे तीन वाजता शिखर चढाईला सुरुवात केली, आणि सकाळी सात वाजता शिखर समिट सक्सेस केले. आम्ही १५ तासांत माउंट एल्ब्रुस पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजुने असणाऱ्या मार्गांनी समिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण खूपच खराब असल्याने दोन्ही बाजूने समिट यशस्वी झाला नाही. ५६४२ मीटर पश्चिम बाजूने समिट सक्सेस झाले. हे शिखर सर करणारी गिरिजा पहिली मुलगी असून पहिल्यांदाच बाप- लेकीच्या जोडीने ही कामगिरी केली आहे. या मोहिमेतून गिरिजाने ‘लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा ‘ हा संदेश दिला आहे. तिची ही मोहीम तिने सर्व मुलींना आणि आजोबांना समर्पित केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजवर गिरीजाने केलेली लक्षवेधी कामगिरी…

गिरीजाने आत्तापर्यंत सह्याद्रीतील लिंगाणा, वजीर सुळका, तैलबैल, नागफणी, कळकराय, संडे-१, संडे-२, वानरलिंगी असे अवघड सुळके सर केले आहेत. त्याबरोबर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ६५ किल्ल्यांवर भटकंती केली आहे. तिच्या लिंगाणा, वजीर या सुळक्यांवर केलेल्या चढाईची युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये यंगेस्ट माउंटेनिअर म्हणून नोंद झालेली आहे.