सागर कासार, पुणे

Pune Fire at Saree Shop: पहाटे चारची वेळ, पुण्यातील देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर दुकानात अचानक आग लाग लागली, दुकानात पाच कामगार झोपले होते, यातील राकेश रियाडला दुकानात आग लागल्याचे लक्षात आले, घाबरलेल्या अवस्थेतच राकेशने थेट दुकान मालकालाच फोन केला. “साहेब, दुकानाला आग लागलीये, खूप धूर आहे, कुठे जाऊ काहीच समजत नाही, तुम्ही लवकर या आणि आम्हाला वाचवा”, असे तो मालकाला म्हणाला. यानंतर दुकानाचे मालक आणि अग्निशमन दलाचे पथकही तिथे पोहोचले खरे, पण दुकानातून बाहेर निघाले ते त्या पाच कामगारांचे मृतदेह.

पुण्यातील देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला गुरुवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत राकेश रियाड (२४), राकेश मेघवाल (२०), धर्माराम बडियासर (२४), सूरज शर्मा (२५) सर्व राजस्थान आणि लातूरचा गोपाल चांडक (२३) या पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. दुकानाचे भवरलाल हरीलाल प्रजापती, सुशील बजाज आणि सुरेश जाकड हे तिघे मालक आहेत.

पहाटे आग लागली त्यावेळी पाच कामगारांपैकी राकेश सुखदेव रियाड या कामगाराने दुकान मालक सुरेश जाकड यांना फोन केला. “दुकानाला आग लागली असून साहेब आम्हाला बाहेर काढा”, असे राकेशने प्रजापती यांना सांगितले. राकेशच्या फोननंतर प्रजापतींनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली आणि ते देखील दुकानाच्या दिशेने निघाले. काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब आणि जाकड हे दोघेही घटनास्थळी पोहोचले.

दुकानात पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुकानाच्या आत जाणे शक्य नव्हते. परिस्थिती लक्षात घेता अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोवर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर जाकड यांना राकेशचा शेवटचा फोन आठवला आणि त्यांना अश्रू आवरता आले नाही .

दररोज रात्री दुकानात रहायचे कामगार
राजयोग साडी सेंटर या दुकानात रोज रात्रीच्या वेळी तिथे काही कामगार राहत होते. रात्रीच्या वेळी दुकानाला बाहेरुन लॉक लावले जायचे. बुधवारी रात्री देखील नेहमीप्रमाणे दुकानाच्या वरच्या मजल्यावर पाच कामगार झोपले होते आणि आग लागली.