पिंपरी : दुथडी भरून वेगाने वाहणारी इंद्रायणी नदी… नदीमध्ये चहू बाजूंनी वेढलेल्या भू-भागामध्ये अडकून पडलेल्या तीन गायींचा हंबरडा… अशा परिस्थितीत त्या गायींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास चाललेले बचावकार्य… अंगावर शहारा आणि प्राणीमात्रांबद्दल हृदयात साठलेला कारुण्यभाव… संपूर्ण प्रकार डोळ्याची पापणी न लवता पाहणारे परिसरातील नागरिक… आणि आपत्कालीन यंत्रणेने अथक परिश्रमाने केलेली गायींची सुखरूप सुटका… हा थरार शुक्रवारी देही याची डोळा पाहणाऱ्या नागरिकांनी अनुभवला.

चऱ्होली बुद्रुक येथील इंद्रायणी धाम स्मशानभूमीच्या किनाऱ्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या नदीपात्रातील बेटावर गेल्या दोन दिवसांपासून तीन गायी अडकून पडल्या होत्या. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीची पाण्याची पातळी वाढत गेल्याने गायींच्या सुटकेबाबत सर्वजण चिंतीत होते. अशातच महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली. चऱ्होली येथील नदीपात्रातील बेटावर अडकलेल्या गायींची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मोहीम हाती घेतली. महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. तीन तास चाललेल्या या बचावकार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्याधुनिक सुसज्ज उपकरणांसह तीन बोटी आणि दोरखंडाच्या सहाय्याने गायींना सुखरूप नदीकाठी आणले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अग्निशमन दलाची दोन वाहने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसदा दलाची तीन वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

बचावकार्यामध्ये असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर यांच्या अधिपत्याखाली आणि निरीक्षक हनुमंत नांबा यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफचे २५ जवान, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखालील १० पोलीस कर्मचारी, उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांच्या अधिपत्याखाली मोशी अग्निशमन केंद्राचे ९ जवान व तळवडे अग्निशमन केंद्रांचे १४ जवानांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. या संपूर्ण मोहिमेत लाईफ प्रोटेक्शन अँड कंजर्वेशन ट्रस्ट फाउंडर विक्रम भोसले आणि टीम, अलंकापुरी रेस्क्यू टीम, शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम, बजरंग दल गोरक्षक टीम यांचेही सहकार्य लाभले. गायींचे मालक भानुदास कुंभार यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा – ‘स्मार्ट सिटी’मध्ये काँक्रिटीकरण, अतिक्रमणाचा पूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बचावकार्यादरम्यान माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेविका विनया तापकीर तसेच परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.