मेहुण्याने जमिनीच्या व्यवहारात फसवल्याने राग अनावर झालेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर आपल्या सहा वर्षांच्या मुलासमोर विषारी औषध पिऊन जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना हिंजेवडी येथील जांबे नेरे येथे आज घडली. दिलीप राठोड असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, त्याची पत्नी ललिता राठोड गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप राठोड याची त्याच्या मेहुण्याने जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केली होती. त्यावरून दिलीपला राग आला होता. याच रागातून त्याने आज, गुरुवारी सकाळी आपली पत्नी ललिता राठोड हिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या आपल्या सहा वर्षांच्या मुलासमोर दिलीपने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दिलीपने केलेल्या हल्ल्यात ललिता गंभीर जखमी झाली आहे.
दिलीप राठोड हा पत्नी ललिताला दररोज क्षुल्लक कारणांवरून मारहाण करत होता. मारहाण होऊनही ललिता याबाबत माहेरच्या मंडळीला काहीही सांगत नसे, अशी माहितीही चौकशीत पुढे आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, ही घटना जमिनीच्या व्यवहारातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जमिनीचा वाद असल्याचा उल्लेख केलेली चिठ्ठी दिलीप याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पत्नीची हत्या करून दिलीपला आत्महत्या करायची होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दिशेने हिंजेवडी पोलीस तपास करत आहेत.