पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते बेपत्ता असून पोलीस अद्याप त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, त्यांचं अपहरण केलं असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. आम्हाला फक्त आमचे वडील हवे आहेत, अशी प्रतिक्रिया गौतम पाषाणकर यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी दिली. त्यांनी टिव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादात संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं.

“आता आठ दिवस होऊन गेले आहेत तरी त्यांची माहिती मिळत नाहीये. दोन तीन दिवसांनंतर आम्हीही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या चिठ्ठीत लिहिलेल्या माहितीच्या दृष्टीनं शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात काही माहिती आमच्या समोर आली. काही व्यक्तींशी त्यांचे संवाद झाले. त्यांना धमक्या, ब्लॅकमेल करण्यात आलं, अशा गोष्टी पोलिसांना सांगणं माझं कर्तव्य होतं. ही जी व्यक्ती आहे त्याची माहिती पोलिसांना दिली,” असं कपिल पाषाणकर म्हणाले. “ती व्यक्ती मंत्रालयात आहे आणि तीन दिवसांनी येईल या सर्व गोष्टी सांगण्याची गरज नव्हती. जर पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा अर्थ काय आणि इतक्या दिवसांनीही त्या व्यक्तीची चौकशी होत नसेल तर नक्कीच पोलिसांवर काही दबाव असेल असं आमच्या मनात येतं. कुटुंब म्हणून आम्हाला आमचे वडील परत हवे आहेत,” असंही ते म्हणाले.
“या प्रकरणात थेट राजकीय व्यक्तीचा सहभाग नाही. परंतु जी व्यक्ती आहे ती राजकीय व्यक्तीशी संबंधित आहे. ते थेट त्यांचं नाव घेत आहेत. सध्या कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला माझे वडील सर्वप्रथम हवे आहेत. ते परत आल्यानंतर ते स्वत: सांगतील. त्यांना शक्य नसल्यास मी त्याचा पाठलाग करेन. ज्यामुळे माझ्या वडिलांना त्रास झाला त्याबदल्यात त्यांना नक्कीच न्याय मिळवून देईन,” असंही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली.”