विक्रम केल्यानंतर आयटी अभियंता असलेले विनिल ढसाढसा रडले
प्रतिनिधी, कृष्णा पांचाळ
पिंपरी- चिंचवड शहरातील आयटी अभियंता असलेल्या तरुणाने चक्क अवघ्या २४ तासात तब्बल ३ हजार ४८ किलोमीटर बाईकवरून प्रवास करून विक्रमाला गवसणी घातली आहे. विनिल खारगे अस या आयटी अभियंता तरुणाचे नाव आहे. त्याने पुणे ते कन्याकुमारी आणि पुन्हा पुणे असा बाईकवरून प्रवास करत विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. विक्रम नोंदवल्यानंतर विनिलला आनंदाश्रू अनावर झाले होते अशी माहिती त्याने दिली आहे. अशक्य वाटणारे ध्येय देखील आपण संपादित करू शकतो असा संदेश पिंपरी- चिंचवड शहरातील विनिल ने दिला आहे.
हेही वाचा >>> पुणे : भाजपचे माजी नगरसेवक संजय घुले यांच्या विरुद्ध गुन्हा; जमीन खरेदी विक्री व्यवहारात महिलेची फसवणूक
२०१५ साली पुणे ते चेन्नई असा २ हजार १३७ किलोमीटर चा प्रवास करून विक्रम नोंदवला होता. तो विक्रम कोणी मॉडेल का? असा प्रश्न आयटी अभियंता विनिलला सतावत होता. परंतु, त्या दिवसापासूनच विनिल ने स्वतः चा विक्रम मोडीत काढण्याचे ठरवले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये विनिलने पुणे ते कन्याकुमारी रस्त्याची एसटीने प्रवास करून रस्त्याची पाहणी करत पुणे ते कन्याकुमारी बाईक ने जाण्याचा निश्चय केला. फेब्रुवारी २०२३ त्याने त्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बाईक ने थेट पुणे ते कन्याकुमारी आणि पुन्हा पुणे असा ३ हजार ४८ किलोमीटर चा बाईकवरून प्रवास अवघ्या २३ तास आणि ५७ मिनिटात करत विक्रमला गवसणी घातली आहे. विक्रम नोंदवल्यानंतर विनिल अक्षरशः ढसाढसा रडत होता. ही माहिती सांगताना विनिल भावनिक झाल्याचे पाहायला मिळालं. विनिल ला कमी अवधीमध्ये दुचाकीवर जगाची भ्रमंती करत विश्वविक्रम करायचा आहे. यासाठी त्याला प्रायोजकत्व हवे आहेत. असे आवाहन त्याने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना नागरिकांना केले आहे. अशक्य वाटणारे हे रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केले असून त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.