scorecardresearch

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने! 

२०१५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले होते.

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने! 
कर्वेनगरच्या उड्डाणपुलाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ( छायाचित्र : तन्मय ठोंबरे)

वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

कर्वेनगर भागातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारा कमिन्स महाविद्यालय ते युनिव्हर्सल चौकदरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम मागील तब्बल पाच वर्षांपासून रखडले आहे. २०१२ मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. २०१५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले होते. मात्र, कासवगतीच्या कामामुळे हे आश्वासन हवेतच विरले आहे. वाहतुकीचा प्रश्न सुटेल अशी नागरिकांची अपेक्षा असताना ही समस्या या रखडलेल्या कामामुळे आणखी जटील झाली असल्याने नागरिक आणि वाहन चालक हैराण झाले आहेत.

पुणे शहराचा समावेश स्मार्ट शहरांच्या यादीत झाला असताना दुसऱ्या बाजूला शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. त्याचाच परिणाम म्हणून कर्वेनगर, वारजे परिसरातील नागरिकांना रहदारीच्या वेळेला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे या परिसरातून वाहने चालवणे म्हणजे जीव धोक्यात घालणे असल्याची भावना परिसरातील नागरिक बोलून दाखवतात. वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ते मुळात अरुंद असताना पत्रे लावून ते दुभागल्याने रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. त्यातच रस्त्यावर बसणारे भाजीवाले, पथारीवाले आणि त्यांचे ग्राहक यांची गर्दी असते. त्यामुळे या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचे मत वाहनचालक व्यक्त करतात.

सततच्या वाहतूक कोंडीत पादचाऱ्यांसाठी कोणतीही सोय नाही. जीव मुठीत धरून रस्ते ओलांडावे लागतात किंवा थेट रस्त्यावरूनच चालावे लागते. या भागात सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम वेळेत संपवावे अशी मागणी सर्व स्तरांतील नागरिकांकडून केली जात आहे. मार्च २०१६ मध्ये महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि स्थानिक नगरसेवकांनी या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाची पहाणी केली होती. त्यावेळी जून २०१७ पर्यंत उड्डाणपुलाच्या किमान एका बाजूचे काम संपवून वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सद्यस्थितीत कूर्मगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम पाहता ते आश्वासनही हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम नक्की कधी पूर्ण होणार याचे उत्तर सध्या तरी कुणाकडे नाही.

किमान तात्पुरते सिग्नल तरी बसवा!

कर्वेनगर उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी येथील वाहतुकीची परिस्थिती डोकेदुखी ठरत आहे. सकाळी आणि संध्याकाळी रहदारीच्या वेळी येथील अरुंद रस्त्यांवरून मार्ग काढणे नागरिकांसाठी जिकिरीचे ठरते. ऐन गर्दीच्या वेळी मोजक्या वाहतूक पोलिसांवर येथील गर्दीच्या नियोजनाची जबाबदारी दिली जाते. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे कमिन्स महाविद्यालयाचा चौक, आंबेडकर चौक, युनिव्हर्सल वर्तुळ अशा महत्त्वाच्या ठिकाणी किमान तात्पुरते सिग्नल उभे करावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-10-2017 at 03:59 IST

संबंधित बातम्या