पिंपरी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातून लाखो वैष्णवांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. वैष्णवांच्या उपस्थितीने अलंकापुरी फुलली आहे. ‘ज्ञानोबा, तुकोबा’चा जयघोष आणि पारायणाने आळंदीतील वातावरण भक्तिमय झाले आहे.कार्तिकी वारीतील मुख्य एकादशी सोहळा आज (शनिवारी), तर माउलींचा ७५० वा संजीवन समाधीदिन सोहळा सोमवारी (१७ नोव्हेंबर) रोजी संपन्न होणार आहे.

यानिमित्त वारकरी मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाले आहेत. त्यामुळे दिवसभर आळंदीत हरिनामाचा जागर, भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू आहेत. माउलींच्या समाधी दर्शनासाठी गर्दी ओसंडून वाहत आहे. तीन तास दर्शनासाठी लागत आहेत. भाविकांना महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग ठेवला आहे. वारकऱ्यांच्या दिंड्यांनी राहुट्या उभारल्या आहेत. शेजारीच मंडप टाकून ज्ञानेश्वरी सप्ताह, कीर्तन, भजन सुरू आहे.

राहुट्यांमध्ये कोणी विश्रांती घेत आहे, तर राहुट्यांशेजारी वारकरी भाविकांच्या भोजनव्यवस्थेसाठी तयारी करताना दिसत आहेत. माउली मंदिर, विश्रांत वड, सिद्धबेट येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. कडाक्याची थंडी पडली असताना देखील अगदी भल्या पहाटेपासून भाविक भक्त इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नान करून दर्शनासाठी जात आहेत. टाळ मृदंगाचा निनाद, ‘ज्ञानोबा, तुकोबा’चा जयघोष, ठिकठिकाणी सुरू असलेले हरिपाठ, प्रवचन, कीर्तन यामुळे अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली आहे. वारकरी साहित्याची दुकाने सजली आहेत. वारकरी भागवत पुराण, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, तुकामारांची गाथा अशा विविध ग्रंथ पुस्तकाची खरेदी करताना दिसून येत आहेत.

इंद्रायणीतील पाणी पिण्यास मनाई

या सोहळाच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबरपर्यंत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरिता वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ते पाणी भांडी घासण्यासह अन्य कारणांसाठी वापरता येईल. आळंदीतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतीही कपडे धुवू नये, नदीचे पाणी दूषित होईल, असे कृत्य करू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.