पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कै. बालगंधर्व, कै. स्मिता पाटील, कै. आचार्य अत्रे, कै. अरुण सरनाईक, कै. जयंत दळवी या मान्यवरांच्या नावे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण नाट्यगृहात शनिवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेचे मुंबईचे विश्वस्त अशोक हांडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ नाट्य संगीतकार ज्ञानेश पेंढारकर यांना कै. बालगंधर्व पुरस्कार, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना आचार्य प्र.के. अत्रे, अभिनेते- लेखक प्रवीण तरडे यांना कै. अरुण सरनाईक, अभिनेत्री स्पृहा जोशी यांना कै. स्मिता पाटील आणि नाट्य-सिने-मालिका लेखक अरविंद जगताप यांना कै. जयवंत दळवी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

याचबरोबर गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक सुरेश साखवळकर यांचा नाट्य परिषद, मध्यवर्तीचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप उर्फ जम्माड देशमुख, संदीप उर्फ बबलू जगदाळे, सोमनाथ तरटे यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यनाट्य स्पर्धा २०२४ चे पुरस्कार विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहेत. यामध्ये मनोहर जुवाटकर, कमलेश बिचे, विनायक परदेशी, अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले, दिनेश साबळे यांचा समावेश आहे. तसेच शहरातील स्थानिक कलाकार व रंगमंचावरील विविध तंत्रज्ञ यांना विषेश पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.