पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमडळ विस्ताराचा मार्गही मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातून मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. सध्या मंत्रिमंडळात कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश असून माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर, सुनील कांबळे यांची नावे पुण्यातून चर्चेत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून आमदार महेश लांडगे तर जिल्ह्यातून राहुल कुल यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची आगामी निवडणूक लक्षात घेऊन या दोन्ही शहराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये पुणे आणि पिंपरीसह जिल्ह्यातील आमदार उत्सुक असले तरी मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र वापरले जाणार की, आगामी निवडणूक लक्षात घेऊन मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद दिले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये १२ मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार आहेत. तर उर्वरित नऊ मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. ठाकरे गटाचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच वर्चस्व आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढवायचा असेल तर जिल्ह्यातून मंत्रिपद द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना टक्कर देणारा नेता जिल्ह्यातून मंत्रीपदाच्या शर्यतीत असेल, अशी चर्चा आहे.
पिंपरीतून आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांना मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात आहे. या तिघांची बलस्थाने आणि त्यांच्यापुढील आव्हाने काय आहेत, याचा मंत्रिपद देताना विचार केला जाईल. पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातून अद्यापही महिला आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. भाजपचे सरकार असताना मिसाळ मंत्रिपदासाठी आग्रही होत्या. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्यास शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आणि फडणवीस यांचे समर्थक सिद्धार्थ शिरोळे यांचा तर जातीय समीकरणे जुळविण्यासाठी सुनील कांबळे यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे. दौंड मतदारसंघातून निवडून आलेले राहुल कुल यांना जिल्ह्यातून संधी मिळेल, असा अंदाज आहे. राहुल कुल यांनी २०१४ मधील निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर तर २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जिंकली होती. राहुल कुल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.