मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर देवले पुलाजवळ मध्यरात्री दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील देवले पूल ते ताजे पेट्रोल पंप दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती.

देवले पुलाजवळ एका मार्गिकेचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन मार्गिंकावरून वाहतूक सुरू आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेला ट्रक समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळला. अपघातात ट्रकमधील एकाचा मृत्यू झाला तसेच एक जण जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही ट्रक क्रेनच्या सहाय्याने सकाळी बाजूला काढण्यात आले.

सकाळी दहाच्या दरम्यान या भागातील वाहतूक सुरळीत झाली. अपघातात मृत्यूमुखी पडलेला ट्रकमधील एकाचे नाव पत्ता समजू शकला नाही, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. आठवड्यापूर्वी देवले पुलाजवळ कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.