रिक्षा, खासगी गाडय़ा, सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध तूर्तास कायम
पुणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या अन्य भागात जीवनावश्यक वस्तूंसह विविध प्रकारची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयानंतर वैयक्तिक दुचाकी आणि चार चाकी गाडय़ांचा वापर करण्यासही महापालिकेने परवानगी दिली आहे. याशिवाय नागरिकांना पेट्रोल-डिझेलची विक्री करण्यासही महापालिके ने परवानगी दिली आहे. मात्र,वैयक्तिक वाहन वापराला परवानगी देतानाच रिक्षा, खासगी गाडय़ा आणि सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध तूर्तास कायम ठेवण्यात आले आहेत.
प्रतिबंधित क्षेत्र (करोनाग्रस्त परिसर) वगळून लाल श्रेणीबरोबरच नारंगी आणि हिरव्या श्रेणीच्या भागातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील जास्तीत जास्त पाच एकल दुकाने (स्टॅण्ड अलोन) सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या आदेशानुसार महापालिके नेही पुणेकरांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले . या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा तिसरा टप्पा आणि महापालिके ने घेतलेल्या निर्णयांची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
शहराचे ८४ चौरस किलोमीटर लांबीचे प्रतिबंधित क्षेत्र कमी करून ते १० चौरस किलोमीटर करण्यात आले आहे. हा प्रतिबंधित परिसर वगळून शहराच्या अन्य भागातील काही दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना वैयक्तिक दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांचा वापर करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सवलत देण्यात आलेल्या भागातील रस्त्यांवरील बॅरिके डस् कमी करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. पेट्रोल पंपांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच अन्य नागरिकांनाही पेट्रोल विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांना इंधन भरण्यासाठी वेगळ्या किं वा स्वतंत्र पासची आवश्यकता नाही. केंद्राच्या अध्यादेशानुसार निश्चित के लेल्या वेळांमध्ये पेट्रोल पंप सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. वैयक्तिक वाहनांना रस्त्यावर येण्यास परवानगी असली तरी तीन आसनी रिक्षा, सहा आसनी रिक्षा, अन्य खासगी वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक सध्या बंद ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल, मद्य विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यात येतील.