पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या प्रभाग ४० (अ) मधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी मनसेच्या इंदुमती फुलावरे यांचा पराभव केला. या निकालामुळे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडेच राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लक्ष्मी घोडके या ४५१ मतांनी विजयी झाल्या.
रविवारी या पोटनिवडणुकीसाठी ४२.८२ टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया अतिशय निरुत्साही वातावरणात पण शांततेत पार पडली होती. बनावट जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी समितीचे बनावट प्रमाणपत्र पत्र देऊन महापालिका निवडणूक लढविल्याचे सिद्ध झाल्यामुळे मनसेच्या कल्पना बहिरट यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली.
भोसरीत राष्ट्रवादीच्या श्रद्धा लांडे विजयी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी गावठाण प्रभागाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. श्रद्धा लांडे विजय़ी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या सारीका कोतवाल यांचा ३०२५ मतांनी पराभव केला. लांडे यांना ३९८८ मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कोतवाल ९६३ मतांवर समाधान मानावे लागले होते. या पोटनिवडणुकीत मतदारांनी निरुत्साह दाखवल्याने अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. मतदारांच्या संथ प्रतिसादामुळे या पोटनिवडणुकीत अवघे २८.९५ टक्के मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरीतील नगरसेविका सीमा फुगे यांचे पद रद्द करण्याची कारवाई पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केली होती. फुगे यांनी बनावट जातीचा दाखला देऊन पालिकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2013 रोजी प्रकाशित
पुण्यात मनसेची हवा गुल; पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या घोडके विजयी
पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या प्रभाग ४० (अ) मधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी मनसेच्या इंदुमती फुलावरे यांचा पराभव केला.

First published on: 08-07-2013 at 11:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation bypoll results