पुणे : मिळकतकर थकबाकीदारांकडून थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या ‘अभय योजने’त पहिल्या दिवशी ६ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ११२७ थकबाकीदारांनी ही रक्कम भरली.
महापालिकेला विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये २ हजार कोटी, मोबाइल टॉवरची ४ हजार २५० कोटी आणि जुन्या हद्दीतील ६ लाख ३७ हजार ६०९ मिळकतींची सुमारे १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी आहे. त्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत अभय योजना राबविली जाणार आहे.
अभय योजनेत थकीत मिळकतकरावर महापालिकेने दोन टक्के प्रति महिना या दराने आकारलेल्या दंडाच्या रकमेवर सुमारे ७५ टक्के सूट मिळणार आहे. निवासी, बिगरनिवासी व मोकळ्या जागा अशा ४ लाख ८१ हजार मिळकतींच्या लाभार्थ्यांना अभय योजनेचा फायदा होणार आहे. शनिवारी, पहिल्याच दिवशी ६ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम महापलिकेच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या योजनेची सुरुवात झाल्याने शनिवारी महापालिकेची मुख्य इमारत, १५ क्षेत्रीय कार्यालये व ५९ नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी फलक, बॅनर लावून, तसेच रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आलेल्या करदात्यांचे निरीक्षक, पेठ निरीक्षक यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
काय आहे अभय योजना
नागरिकांकडे असलेली मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ‘अभय योजना’ राबविली जाणार आहे. यासाठी थकबाकीच्या दंडावर ७५ टक्के सवलत मिळणार आहे. यापूर्वीच्या ‘अभय योजने’चा लाभ घेतलेल्या थकबाकीदार मिळकतदारांना मात्र याची सवलत दिली जाणार नाही. महापालिकेची मिळकरदारांकडे सुमारे १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ३ हजार १५८ कोटी मुळ मिळकतकराची थकबाकी असून, त्यावर दंडाची रक्कम ९ हजार कोटी रुपयांची आहे. वर्षानुवर्षे हा मिळकतकर थकीत असल्याने महापालिका प्रत्येक महिन्याला त्यावर दोन टक्के व्याज आकारते. परिणामी, थकबाकीची रक्कम वाढतच असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘अभय योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
