महापालिकेच्या निवडणुकीला अजून आठ महिने बाकी असले तरी निवडणुकीला इच्छुक असलेल्यांकडून आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या तयारीमुळे ‘मतदार राजा’साठी अनेकविध प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जात आहेत आणि मुख्य म्हणजे हे सारे कार्यक्रम ‘मोफत, मोफत, मोफत..’ या प्रकारातील आहेत.

महापालिकेची आगामी निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होण्याची शक्यता अधिक असून त्यासंबंधीचा मंत्रिमंडळाचा निर्णय बाकी असला तरी तसा निर्णय झाल्यासारखाच आहे, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये जी महापालिकेची निवडणूक होईल त्यात प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून जातील. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक मतदाराने निवडणुकीत चार मते द्यायची असून सध्याच्या प्रभागांची हद्दही मोठी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्याही वाढणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने विद्यमान नगरसेवकांसह सर्व पक्षांमधील इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विशेषत: प्रभाग मोठे होत असतानाच त्यांची हद्दही बदलणार आहे. त्यामुळे सध्याचा प्रभाग डोळ्यापुढे ठेवत असतानाच आसपासच्या दोन-तीन प्रभागांवर लक्ष ठेवून नगरसेवकांना आणि अन्य इच्छुकांना निवडणूक तयारी करावी लागत आहे. इच्छुकांना त्यामुळे उपक्रमांची, कार्यक्रमांची व्याप्तीही वाढवावी लागत असून परिणामी खर्चही मोठय़ा प्रमाणात करावा लागत आहे. महिला आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागातून दोन महिला निवडून जाणार आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांची तयारी सपत्नीकही सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे.

निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी सध्या थेट राजकीय प्रचार न करता वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. शाळांना सुटय़ा असल्यामुळे त्यात मुख्यत: लहान मुलांसाठी बालजत्रा, सहल, बालमेळावा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मोठय़ांसाठीही सहलींचे आयोजन केले जात असून इतरही अनेक सेवा-सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. महिलांना दुचाकी व चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आणि वाहन चालवण्याचा परवाना देण्याचे उपक्रम काही भागांमध्ये सुरू करण्यात आले असून वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय दाखले देण्याची व्यवस्थाही इच्छुकांकडून केली जात आहे. त्यात मुख्यत: जन्मदाखला, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला यासह अनेक दाखले व प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात येत आहे. अनेक इच्छुकांनी तसेच विद्यमान नगरसेवकांनी युवकांसाठी दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम या विषयाची माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित केली असून स्पर्धा परीक्षांसाठीही मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शालेय साहित्य वाटप, दप्तरे वाटप त्या बरोबरच विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात शालेय साहित्य वस्तू विक्री केंद्र अशा प्रकारचेही उपक्रम केले जात आहेत.

फ्लेक्सचे क्षेत्र विस्तारले

महापालिका निवडणूक लढवून इच्छिणाऱ्यांनी काही ना काही निमित्ताने लोकांसमोर राहण्यासाठी सातत्याने फ्लेक्स लावायला सुरुवात केली असून स्वत:च्या प्रभागाव्यतिरिक्त आगामी निवडणुकीसाठी प्रभाग किती मोठा होईल याचा विचार करून विस्तारित क्षेत्रापर्यंत फ्लेक्स लावण्याची काळजी इच्छुकांकडून घेतली जात आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत हे आतापासूनच फ्लेक्सवरून समजू लागले आहे.