पुणे : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले. उर्वरित १४ नगरसेवक हे भाजपचे होते. या निवडणुकीत भाजपने प्रभाग रचना करताना ‘शतप्रतिशत भाजप’साठी व्यूहरचना आखली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मेधा कुलकर्णी यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघातील प्रभाग रचनेमुळे प्रामुख्याने शिवसेना (ठाकरे) गट आणि काँग्रेसची कोंडी झाली असून, भाजपने आखलेली व्यूहरचना भेदण्याचे या दोन्ही पक्षांमुळे आव्हान असणार आहे.
कोथरूडमध्ये भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. त्याचबरोबर शिवसेना (ठाकरे) पक्षाचेही समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या निवडणुकीत २० नगरसेवकांपैकी भाजपचे १४, तत्कालीन शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एरंडवणा-हॅपी कॉलनी आणि बावधन खुर्द-कोथरूड डेपो या दोन प्रभागांमध्ये आठही भाजपचे नगरसेवक होते.
या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना करताना भाजपकडून अन्य पक्षांची कोंडी कशी होईल, याची विशेष दक्षता घेतल्याचे दिसून येते. मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी या प्रभागातून माजी आमदार शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार आणि वासंती जाधव हे दोन शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या प्रभागाचे नगरसेवक होते. या प्रभागाला आता मयूर कॉलनी-कोथरूड असे नाव देण्यात आले असून, डहाणूकर काॅलनीचा भाग वगळला आहे. या प्रभागाची रचना करताना पूर्णपणे भाजपचा हक्काचा भाग घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) गटापुढे आव्हान उभे राहणार आहे. मागील निवडणुकीत मोहोळ यांच्या विरोधात उभे असलेले तत्कालीन शिवसेनेचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे हे आता भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी कमकुवत झाली आहे.
रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर हा प्रभाग झोपडपट्ट्यांचा परिसर असलेला आहे. रामचंद्र उर्फ चंदू कदम आणि वैशाली मराठे हे दोनच काँग्रेसचे नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे या प्रभागात प्राबल्य असून, ते सातत्याने निवडून येत असतात. भाजपने प्रभाग रचना करताना झोपडपट्ट्यांबरोबरच भाजपचा पारंपरिक मतदार असलेला सोसायट्यांचा परिसर या प्रभागाला जोडला आहे. या प्रभागात छाया मारणे या एकच भाजपच्या नगरसेविका निवडून आल्या होत्या. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून ‘शतप्रतिशत भाजप’साठी या प्रभागाची रचना करण्यात आल्याचे दिसून येते.
एरंडवणा-हॅपी कॉलनी या प्रभागाला डेक्कन जिमखाना परिसर जोडून आता ‘डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी’ असे नाव या प्रभागाला देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपसाठी हा प्रभाग आणखी सुरक्षित झाला आहे. बावधन खुर्द-कोथरूड डेपो हा भाजपचा पारंपरिक मतदार असलेला भाग आहे. त्याचे नाव आता बावधन – भुसारी कॉलनी असे करण्यात आले आहे.
बाणेर-बालेवाडी, पाषाण या प्रभागात बाबुराव चांदेरे हे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. उर्वरित तीन नगरसेवक भाजपचे होते. आता या प्रभागाची रचना बदलली आहे.
कोथरुडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही ताकद होती. मात्र, ती आता क्षीण झाली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाची या परिसरात ताकद नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची कोंडी करून ‘शतप्रतिशत भाजप’ची मोहीम यशस्वी होणार का? याबाबत उत्सुकता असणार आहे.
दृष्टिक्षेप
प्रभाग क्रमांक – प्रभागाचे नाव
१० – बावधन-भुसारी कॉलनी
२९ – डेक्कन जिमखाना – हॅपी कॉलनी
३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
३१ मयूर कॉलनी – कोथरूड