पुणे : महापालिका भवन मेट्रो स्थानक परिसरात आंदोलन करणाऱ्या नऊ जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. या प्रकरणातील उर्वरित आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मेट्रो मार्गावर आंदोलन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

महापालिका भवन मेट्रो स्थानक परिसरात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) निलंबित करण्यात आलेला नरेंद्र पावटेकर याच्यासह साथीदारांनी आंदोलन केले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कोणतीही कल्पना न देता परस्पर आंदोलन केले होते. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी नरेंद्र पावटेकर (वय २५), त्याचे वडील ज्ञानेश्वर (वय ६२, दोघे रा. गणेश पेठ) यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने सोमवारी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उर्वरित आठ आरोपींचा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

आरोपींना सोमवारी न्यायलयात हजर करण्यात आले. आरोपी पावटेकरने आंदोलन करण्यापूर्वी कोणाशी संपर्क साधला, तसेच संदेश पाठविला, यादृष्टीने तपास करायचा आहे. मेट्रो स्थानक संवेदनशील ठिकाण आहे. आरोपींनी मेट्रो मार्गिका (रुळ), तसेच, इलेक्ट्रिक वायरचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्याशी झटापट केली. आरोपींनी पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतले. झटापटीत पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासह पाच महिला पोलीस कर्मचारी जखम झाल्या. आंदोलनामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या दृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीत देण्याची विनंती सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने पावटेकर याच्यासह नऊ जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोफत शिक्षण, नोकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी या सर्व आरोपींनी रविवारी दुपारी दोन तास मेट्रोच्या मार्गिकेवर उतरून आंदोलन केले. आंदोलकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे, दंगल आणि मेट्रो रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेट्रोच्या रुळावर झालेल्या आंदोलनाचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच अन्य शासकीय कार्यालयासमोर आंदाेलन न करता मेट्रो स्थानक आंदोलनासाठी का निवडले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.