पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण सध्या गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचं दिसत आहे. चिंचवडमध्ये बंडखोरी करत शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारच नसल्याने पक्षातील माजी आमदार विलास लांडे आणि दत्ता साने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, विलास लांडे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे बोललं जातंय. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. बंडाच्या पवित्र्यात असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांना ऐनवेळी पिंपरीमधून उमेदवारी देण्यात आली. भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र पक्षाची उमेदवारी न घेता माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला असून त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याच बोलल जात आहे.
लांडे हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी २००९ ला अपक्ष निवडणूक लढवली होती, यात ते विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ ला आमदार महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यामुळे भोसरीमध्ये गेल्या दोन विधानसभांपासून अपक्ष उमेदवार निवडून येत असल्यानेच पक्षाची उमेदवारी कोणी घेतली नाही असं सांगण्यात येत आहे. यावेळेस महेश लांडगे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असून त्यांना अपक्ष उमेदवार काटे की टक्कर देणार आहेत.
चिंचवडमध्ये शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. एकीकडे राज्यात शिवसेना भाजपा पक्षाची युती आहे मात्र चिंचवडमध्ये भाजपाने उमेदवार दिला असताना शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. २०१४ च्या विधासभा वेळी देखील राहुल कलाटे आणि आमदार लक्षण जगताप यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी लक्ष्मण जगताप हे विजयी झाले होते. मात्र, पुन्हा एकदा जगताप विरुद्ध कलाटे अशी लढत पाहायला मिळणार आहे.