शिरूर : शहराच्या मध्यवस्तीतील सुभाष चौक येथे सराफ दुकानात घुसून गोळीबार आणि चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि दोन काडतूस असा सव्वालाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शरद बन्सी मल्लाव (वय २४, रा. काची आळी, शिरूर, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुभाष चौक येथील माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांच्या अशोक जगन्नाथ कुलथे सराफ या दुकानात २८ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांशी प्रतिकार करताना दुकानातील कर्मचारी भिका एकनाथ पंडीत हे जखमी झाले. गोळीबार करून चोरटे मोटारसायकलवरुन पसार झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…द्रुतगती मार्गावर अपघातात टेम्पोचालकासह दोघांचा मृत्यू

गोळीबाराचा आवाजाने परिसरात घबराट आणि मोठी खळबळ उडाली होती.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तपास पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता संशयित आरोपींमध्ये सराईत गुन्हेगाराच्या वर्णनाचा इसम असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गोपनीय माहितीचे आधारे सदरचा हा गुन्हा शरद बन्सी मल्लाव याने त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलु दत्तात्रय सोनलकर (रा. धायरी पुणे) याच्या मदतीने केला असल्याचे समजले. आरोपी हे सिंहगड किल्ल्याचे जंगलात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सिंहगड किल्ला परिसरातील जंगलातून शरद बन्सी मल्लाव याला जेरबंद केले. त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर हा जखमी असून तो ससून रुग्णालय येथे उपचार घेत आहे. शरद मल्लाव याच्यावर सात गुन्हे दाखल असून त्याला पुणे आणि नगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आरोपी सागर ऊर्फ बबलु सोनलकर याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrested a man who open fired and tried to rob a jewelry store at subhash chowk in shirur tehsil pune print news vvk 10 psg
First published on: 01-02-2024 at 18:26 IST