पुणे : घरफोडी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आले असून साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय २०, रा. भापकर वस्ती, मांजरी बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. फुरसुंगी भागात एका रात्रीत तीन दुकाने फोडण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून तपास करण्यात येत होता. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. सराईत चोरटा अजयसिंग दुधानीने हडपसर, कोंढवा, यवत, लोणी काळभोर भागात घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.

घरफोडीचे गुन्हे करुन मिळालेल्या पैशांमधून दुधानीने मोटार खरेदी केली तसेच मौजमजेसाठी पैसे खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, विनोद शिवले, अकबर शेख, प्रमोद टिळेकर आदींनी ही कारवाई केली.