scorecardresearch

पुणे : १ ऑगस्टपासून प्रस्तावित करण्यात आलेली रिक्षाची भाडेवाढ स्थगित

काही रिक्षा संघटनांनी आक्षेप घेतल्याने भाडेवाढीला स्थगिती देण्यात आली

Pune Auto
(प्रातिनिधिक छायाचित्र)

सीएनजी दरवाढीमुळे १ ऑगस्टपासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेली रिक्षाची भाडेवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही रिक्षा संघटनांनी आक्षेप घेतल्याने या भाडेवाढीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्राधिकरणाचे सचिव डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

सीएनजीच्या दरामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये दहा रुपयांची वाढ झाली आहे. इंधनातील ही दरवाढ लक्षात घेता रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ देण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली होती. त्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

पुण्यात रिक्षाची भाडेवाढ ; ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका आता प्रवाशांना बसणार

सध्या रिक्षाच्या पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी सध्या २१ रुपये आकारण्यात येत आहेत. त्यात आता दोन रुपयांची वाढ होऊन पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना २३ रुपये मोजावे लागणार होते. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपयांऐवजी १५ रुपयांची भाडेआकरणी करण्याचे, तर पालिका क्षेत्र वगळून इतर भागांतच रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीसाठी ४० टक्के अतिरिक्त भाडे द्यावे लागणे प्रस्तावित होते. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येणार होती. तर बदललेल्या भाडेदरानुसार रिक्षा मीटरचे प्रमाणीकरणासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र सध्या या भाडेवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 09:28 IST

संबंधित बातम्या