पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून, अडीच महिन्यांत २,७५४ खड्डे, म्हणजेच दिवसाला साधारण ३७ खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. रस्ते खोदण्यास आता मनाई केली असतानाही तातडीने करण्यात येणाऱ्या कामाच्या नावाखाली रस्ते खोदाईची कामे सुरू असल्याचे चित्र आहे. अशा खोदाईची साधी कल्पनाही पथ विभागाला देण्याची तसदी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.
शहरात महापालिकेच्या वतीने दर वर्षी कोट्यवधींचा निधी खर्च करून रस्त्यांची कामे केली जातात. मात्र, या कामांचा दर्जा राखला जात नसल्याची ओरड अनेकदा होते. गेल्या काही दिवसांत पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहे. खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने पथके नेमली आहे. एक एप्रिलपासून महापालिकेने अडीच महिन्याच्या काळात आतापर्यंत २ हजार ७५४ खड्डे बुजविले आहेत. यासाठी ११ हजार ५०५ टन साहित्याचा वापर करण्यात आला आहे. पथ विभागाने १५ हजार चौरस मीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. आतापर्यंत २९६ चेंबरची दुरुस्ती करण्यात आली असून, ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहते, अशा ७२ ठिकाणांची डागडुजी करण्यात आल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
शहरातील रस्ते शास्त्रीय पद्धतीने तयार केले जातात. यासाठी रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांनुसारच काम केले जाते. खड्डेदुरुस्तीही अधिकाधिक शास्त्रीय पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पाऊस थांबल्यानंतर त्वरित खड्डे दुरुस्ती केली जात असल्याचा दावा पावसकर यांनी केला.
रस्ते खोदाई सुरूच, पथ विभागाला कल्पनाच नाही
सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलजवळचा रस्ता मंगळवारी खोदण्यात आला. मात्र, या खोदाईची कोणतीही माहिती पथ विभागाला देण्यात आली नव्हती. पथ विभागाकडे याबाबत चौकशी केल्यानंतर रस्ताखोदाई कुणी केली, याची माहिती घेण्यात आली. त्या वेळी समान पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने हा रस्ता खोदल्याचे समोर आले. रस्ता खोदताना किमान पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना द्यावी, अशी अपेक्षा पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या डांबरीकरणाची ‘गुणवत्ता’ उघड
पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पथ विभागाने शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र, मे अखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पथ विभागाने केलेल्या कामांचा दर्जा समोर आला आहे. नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड ) रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (तुकाईनगर) ते विठ्ठलवाडी कॅनॉल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या कामांबाबत माहिती घेतली जाईल, असे पथ विभागाचे प्रमुख पावसकर यांनी सांगितले.