पिंपरी : ‘मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याला तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारकडून हिंदू-मुस्लिम रंग दिला गेला. या घटनेचा खरा प्राथमिक नोंदणी अहवाल (एफआयआर) गायब करण्यात आला. जो गुन्हा आम्ही केला नाही, त्यासाठी आम्हाला डांबून ठेवले. पण, १७ वर्षांनी न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने तत्कालीन सरकारने आम्हाला विनाकारण अडकविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले,’ असा आरोप या खटल्यातून निर्दोष सुटलेले समीर कुलकर्णी यांनी मंगळवारी केला.
सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात चिंचवड येथील समीर कुलकर्णी यांचे नाव आले होते. न्यायालयाने नुकतीच या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. त्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मंगळवारी चिंचवड येथे कुलकर्णी यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी मुलाखत घेतली. देहू संस्थानाचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव महाराज यांच्यासह आमदार महेश लांडगे, उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या स्फोटापूर्वी २००६ मध्येही स्फोट झाला होता. तत्कालीन सरकारचे हे अपयश होते. २००८ मधील मालेगाव स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी तत्कालीन गृहमंत्री घटनास्थळी गेले. त्या वेळी तेथेही ५६ गोळ्या झाडण्याची घटना घडली. एका पोलीस अधिकाऱ्याचे कान कापले. जेथे ही घटना घडली तेथे ‘सिमी’चे कार्यालय होते. त्याबाबतचे खटले प्रलंबित आहेत. ज्यांनी हे बॉम्बस्फोट केले, त्या गुन्हेगारांना पकडणे अपेक्षित असताना तत्कालीन सरकारने याला हिंदू-मुस्लिम असा रंग दिला.’
‘मला २४ ऑक्टोबर २००८ रोजी संग्राम या खोट्या नावाने भोपाळमधून अटक केली. दुचाकीचे चासी नंबर खोडण्यात आले. वाहन परवाना नाही, वाहन चालवता येत नाही, अशा प्रज्ञा सिंह यांना अटक केली. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे सिंह आज व्यवस्थित चालू शकत नाहीत. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या सांगण्यावरून खोटी नावे घेण्यास सांगितले जात होते. शाकाहारी असताना आमच्या तोंडांत मांसाचे तुकडे घातले गेले. संवेदनशील ठिकाणी पेट्रोल टाकले. दबाव टाकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर लोकांची नावे घेण्यासाठी दबाव आणला. त्या दबावाला बळी पडलो नाही. काही लोकांना ही अमानुष मारहाण सहन झाली नाही, म्हणून त्यांनी पोलीस म्हणतील तसे लिहून दिले,’ असेही ते म्हणाले.
‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून षड्यंत्र’
‘२००९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे षड्यंत्र रचले होते. शरद पवारांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडले. त्यातून त्यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण केले,’ असा आरोप समीर कुलकर्णी यांनी केला.