पुण्याच्या कात्रज परिसरातल्या एका नामांकित रुग्णालात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या खोलीत स्पाय कॅमेरा बसवल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकारामुळे रुग्णालयातील महिला डॉक्टरांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र, पोलिसांनी अखेर हा विकृत प्रकार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख ऐकल्यानंतर तर पोलिसांनाही धक्का बसला. हा आरोपी पुण्याच्यया हिराबाग परिसरामधील प्रथितयश एमडी डॉक्टर असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची देखील माहिती दिली आहे.
काय घडलं होतं?
कात्रज परिसरातील एका नामांकित रुग्णालयात या महिला डॉक्टर नोकरी करतात. रुग्णालयाच्याच क्वार्टर्समध्ये त्या राहतात. मात्र, ६ जुलै रोजी कामावरून घरी परतल्यानंतर लाईट लागत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. वायरमनने दुरुस्तीसाठी पाहिलं असता बल्बमध्ये आणि चार्जरमध्ये छुपा कॅमेरा लपवण्यात आल्याचं लक्षात आलं. या प्रकारानंतर या महिला डॉक्टरांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर खरा आरोपीत सापडला.
CCTV मधून झाला खुलासा
पोलिसंनी आधी क्वार्टर्सच्या वॉचमनकडे तपास केला. मात्र, त्याच्याकडून फारशी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी नंतर क्वार्टर्सच्या परिसरातले सीसीटीव्ही तपासण्यास सुरूवात केली. तेव्हा एक व्यक्ती फिर्यादी महिलेच्या रूमच्या दिशेने जाताना आणि काही वेळाने बाहेर येताना दिसून आली. अधिक तपास केला असता ती व्यक्ती एमडी डॉक्टर सुजीत आबाजीराव जगताप असल्याचं स्पष्ट झालं.
भारती विद्यापीठ परीसरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्याप्रकरणी एका बड्या MD डॉक्टरला अटक झालीये
राज्यातील विकृती दिवसेंदिवस वाढत चाललीये डॉक्टर शिक्षीका IT क्षेत्रातील मुली कष्टकरी शेतकरी सगळ्यांचं क्षेत्रातील महिला या विकृतीला बळी पडताहेत pic.twitter.com/O6QYeYdeA4
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 13, 2021
आरोपीचा हिराबागमध्ये दवाखाना
आरोपी सुजीत जगताप याचा हिराबाग परिसरात दवाखाना आहे. त्याची ओळख पटताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर आपणच संबंधित महिला डॉक्टरच्या खोलीत छुपा कॅमेरा लावल्याचं त्यानं कबूल केलं. बनावट चावीच्या मदतीने रूममध्ये प्रवेश केल्याचंही त्यानं सांगितलं. यानंतर पोलिसांनी सुजीतला अटक केली असून त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये सापडला स्पाय कॅमेरा; गुन्हा दाखल! – वाचा सविस्तर
बनावट चावीने उघडली खोली
त्यावर आम्ही आरोपी सुजीत आबाजीराव जगताप याला ताब्यात घेतले. फिर्यादी महिलेच्या रूममध्ये बनावट चावीद्वारे प्रवेश केला आणि मी तिथे कॅमेरा लावले असल्याची त्याने कबुली दिली आहे. आरोपी हा शहरातील नावाजलेला डॉक्टर असून त्यांचा हिराबाग दवाखाना आहे. आता या प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले. या प्रकरणी अधिक चौकशीसाठी पोलिस कस्टडीची न्यायालयाकडे मागणी केल्यावर, न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.