विदर्भ आणि मराठवाडय़ाबरोबरच उकाडय़ाने आता मध्य महाराष्ट्रालाही हैराण केले असून, या भागात अनेक ठिकाणच्या तापमानात मोठी वाढ झाली. पुण्यात या हंगामात पहिल्यांदाच तापमान ४० अंशांच्या जवळ पोहोचले. पुण्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पट्टय़ात शुक्रवारी उष्मा वाढला होता. अशीच स्थिती पुढील काही दिवस अपेक्षित आहे.
राज्यातील तापमानात गेल्या आठवडय़ापासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: विदर्भात काही ठिकाणी तापमानाने ४३ अंशांचा टप्पा ओलांडला. मराठवाडय़ातही तापमानात वाढ होत आहे. आता तुलनेने कमी उष्ण असलेल्या मध्य महाराष्ट्रातही तापमानात चांगलीच वाढ झाली. पुणे (३९.७ अंश), सातारा (४१.४), सांगली (४१.२), सोलापूर (४१.६), कोल्हापूर (३९) या पैकी बहुतांश ठिकाणी या हंगामात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. तापमानात वाढ झाल्याची स्थिती पुढाल काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर या पट्टय़ात काही ठिकाणी पहाटेच्या वेळी हलक्या सरी पडण्याचा अंदाजही पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
कोकणात नेहमीप्रमाणे तापमान कमी आहेत, मात्र उष्म्यात वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातही उकाडाय कायम आहे. तो तसाच कायम राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्यात इतरत्र शुक्रवारी दुपारी नोंद झालेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये)- महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४२, जळगाव ४१.५, नाशिक ३७.९, मुंबई कुलाबा ३१.५, सांताक्रुझ ३३, अलिबाग ३१.३, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३१.४, भीरा ४१.५, औरंगाबाद ३९.६, परभणी ४१.३, नांदेड ४१, अकोला ४२.१, अमरावती ४२.६, ब्रह्मपुरी ४२.९, चंद्रपूर ४१.४, गोंदिया ४१.३, नागपूर ४२.५, वर्धा ४२.५