भरदिवसा सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा साडेचार लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. कोंढवा, धानोरी भागात या घटना घडल्या.

विनोद हराळे (वय ४८, रा. साईराज रेसीडन्सी, कोंढवा) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हराळे यांच्या बंद सदनिकेचे कुलूप चोरट्यांनी तोडले. कपाटातील ३५ हजारांची रोकड, मनगटी घड्याळे, सोन्याचे दागिने असा तीन लाख ६५ हजारांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव तपास करत आहेत.

दरम्यान, धानोरी-लोहगाव रस्त्यावरील एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील २५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा ८० हजारांचा ऐवज लांबविला. करण लिंगायत (वय ३०, रा. शिवकृपा सोसायटी, धानोरी जकात नाका) यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लिंगायत दुपारी साडेबाराच्या सुमारास सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी ते घरी परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड लांबविल्याचा प्रकार निदर्शनास आला. पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव तपास करत आहेत.

उन्हाळी सुट्टीसाठी अनेकजण बाहेरगावी जातात. चोरटे सोसायटीत शिरुन बंद सदनिकांची पाहणी करतात. कटावणीचा वापर करुन चोरटे कुलूप तोडून ऐवज लांबवितात. भरदिवसा सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.