न्यायालयीन कामकाज संपवून येरवडा कारागृहात नेत असताना लघुशंकेचा बहाणा करून तीन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही घटना सोमवारी (दि. १०) सांयकाळी साडेसातच्या सुमारास कात्रज घाटात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, सोमवारी राजू महादेव पात्रे (वय २५, रा. विद्यानगर, चिंचवड), संतोष मंच्छिंद्र जगताप (वय ३०, रा. मोरवाडी, पिंपरी), लोंढ्या उर्फ संतोष चिंतामण चांदीलकर (वय २५, ता. मुळशी) यांच्यावर खंडाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी या तिघांना खंडाळा पारगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने २१ एप्रिल ही पुढील तारीख दिल्याने त्यांना येरवडा कारागृहात नेले जात होते.
सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट परिसरात एका वळणावर या तिघांनी लघुशंका आल्याचे निमित्त करून गाडी थांबवली. त्याचवेळी त्यांनी पोलिसांना धक्का देत अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. पोलीस हवालदार संजय काशिनाथ चंदनशिवे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune three culprit abscond from police katraj ghat
First published on: 11-04-2017 at 14:47 IST