पुण्यामध्ये स्थानिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पुण्यातील चांदणी चौक परिसरामध्ये उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार यावेळी पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विशेष म्हणजे ताफा अडकल्याने आणि त्याचवेळी स्थानिकांनी शिंदेंकडे तक्रार केल्यानंतर तातडीने त्यांनी या तक्रारीची दखल घेतली. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील विद्यापीठ चौक आणि चांदणी चौकातील रेंगाळलेले उड्डाण पुलांचे काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि पुणेकरांना होणारा त्रास याबाबत गुरुवारी थेट विधिमंडळातच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट या विषयावरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवून त्यांच्याकडे वाहतूक कोंडीची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पुण्याच्या आयुक्तांना स्पॉटवर भेट द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. काही न्यूज पोर्ट्लने दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक बंद पडल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ताफ्याला वाहतूक कोंडीमधून जागा करुन दिली. जेव्हा मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकले त्याचवेळी स्थानिकांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं. इंडिया टीव्ही न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री शिंदे हे वाहतूक कोंडीत अडकल्याने गाडीमधून उतरुन रस्त्याच्या बाजूला येऊन उभे राहिले. त्यानंतर येथील काही स्थानिकांनी त्यांच्याकडे अशी वाहतूक कोंडी रोजचा प्रकार झाला आहे अशी तक्रार केली.

विधिमंडळातील चर्चेदरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सरकारने याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक बोलविण्यात येईल, असे मोघम उत्तर देण्यात आलं होतं. मात्र शनिवारी मुख्यमंत्र्याचाच ताफ अडकल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी होत असणाऱ्या ठिकाणी भेटण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांसमोरच अधिकाऱ्यांना फोन लावून उद्या आयुक्त या कामाचा आढावा घेतील तर या ठिकाणी हजर राहा, असे आदेश दिल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीनेही दिलं आहे. जवळजवळ १५ मिनिटं मुख्यमंत्र्यांचा ताफा एकाच जागी अडकून होता. त्याचवेळी हे सारं घडलं.

पुण्याचे पोलीस आयुक्त (वाहतूक) आनंद भोईते यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडल्याचं सांगितलं. “मुंबई-बंगळुरु माहामार्गावर चांदणी चौकाजवळ एक ट्रक आणि कार बंद पडल्याने दोन मार्गिका बंद झाल्या. त्यामुळे रात्री आठच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी अडकला. आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेत ताफ्यासाठी वाट मोकळी करुन दिली,” असं भोईते यांनी सांगितलं.

विधिमंडळातील उत्तरावरुन तरी पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर सध्यातरी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. या स्थितीत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत असतानाच स्थानिकांनी या वाहतूक कोंडीला कंटाळून थेट मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे मांडल्याने आता तरी यातून सुटका होईल अशी आशा त्यांना आहे.

विधीमंडळात काय चर्चा झाली?
आमदार भीमराव तापकीर आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी विधिमंडळात पुणे शहराच्या वाहतूक कोंडीबाबत लक्षवेधी सूचना मांडली. चांदणी चौक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत या ठिकाणी एक ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना आमदार तापकीर यांनी केली. तसेच आनंदऋषीजी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) चौकातील नवीन उड्डाण पुलाचे काम संथ गतीने होत असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. या उड्डाण पुलाच्या कामाशी संबंधित प्रशासनाने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवावे आणि उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासंबंधीचा कालावधी निश्चित करावा, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले.

शिंदे सरकारने काय उत्तर दिलं?
राज्या शासनाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यावर उत्तर दिले. केसरकर म्हणाले,की चांदणी चौक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येईल आणि याबाबत संबंधित यंत्रणांची गणेशोत्सवानंतर बैठक बोलावण्यात येईल. शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, वाहने लावण्यास आणि थांबण्यास बंदी करणे, सायकल मार्ग आणि पदपथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune traffic issue local halt cm eknath shinde convoy near chandani chowk scsg
First published on: 27-08-2022 at 09:07 IST