सात टक्के दराने गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड परिसरातील दत्ता फुगे ऊर्फ गोल्डमॅन याच्यावर शनिवारी खडकी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. संस्थेत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून फुगे याने ही फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी दत्ता फुगे (रा. भोसरी) अध्यक्ष, वक्रतुंड फायनान्स प्रा. लि., विश्रांतवाडी, गणेश मुनियार  आणि रमेश घाडगे (दोघेही रा. खडकी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भागवत चाटे (३३, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दाखल केली. चाटे यांनी एप्रिल ते जून २०१३ या काळात १३ लाखांची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला सहा महिन्यांकरता सात टक्के दराने परतावा देऊ असे आमिष फुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चाटे यांना दाखवले. मात्र, आतापर्यंत मूळ रकमेचा परतावा देण्यात आलेला नाही. तसेच मूळ रक्कम परत न मिळाल्यामुळे भागवत यांनी त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी कारवाई केली.