मूलतत्त्ववादी मंडळींनी गेल्या काही वर्षांत तरुणांना आपल्या सापळ्यात अडकवले असून, त्यांच्या मनात मर्दानगीची संकल्पना ठसवली जात आहे. अशा स्थितीत लिंगभाव समतेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी येत्या ३० मे रोजी ‘पुरूषभान परिषदे’चे आयोजन केले असून, त्यात तरुणाईची या विषयावरील मते ऐकून घेतली जाणार आहेत.
गेल्या काही काळात खून, बलात्कार, तथाकथित संस्कृतीरक्षकांकडून पुन्हा पुन्हा होणारे हल्ले, त्याचबरोबर सांप्रदायिकतावादी सरकारामधील मंत्र्यांची प्रक्षोभक वक्तव्ये असे वातावरण आहे. यातून मर्दानगी आणि सत्तासंबंधी परिभाषेचा प्रसार केला जात आहे. तो अधिक दृढ करण्यासाठी मूलतत्त्ववादी मंडळी तरुणांना हाताशी धरून त्यांच्याकडून पद्धतशीरपणे हल्ले घडवून आणत आहेत. त्यांना मुद्दाम ‘मर्दानगी’ या विषयावरील वैचारिक चर्चाविश्वाच्या परिघाबाहेर ठेवण्यात येत आहे. स्त्रीवादी आणि काही सामाजिक संघटना मांडत असलेले विचार आणि चर्चाविश्वाच्या जवळपास ही तरुणाई फिरकू नये म्हणून जाणीवपूर्वकपणे प्रयत्न केले जात आहेत. मूलतत्त्ववादी मंडळी काही नव्या परिभाषा, जुन्या शब्द संकल्पना, आयकॉन्स मनात पेरत आहेत. नव्या ‘मर्दानी अस्मिता’ त्यांच्या डोक्यात घुसवत आहेत. त्यामुळे सामाजिक संघटनांचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचत नाहीत, असे निवेदन या परिषदेच्या आयोजक डॉ. कुंदा प्रमिला नीळकंठ, डॉ. गीताली वि. म. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या पाश्र्वभूमीवर सध्या तरुणांना नेमके काय वाटते, त्यांचे अनुभवविश्व काय आहे हे समजून घ्यावे लागेल. त्यासाठी लिंगभाव समतेसाठी काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन येत्या ३० मे रोजी ‘पुरूषभान परिषद’ आयोजित केली आहे. त्यात युवकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यात २० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांनी सहभाग घ्यावा आणि नागरिकांनीही प्रेक्षक म्हणून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या परिषदेत संघटना म्हणून सहभागी होता येईल. त्यासाठी डॉ. कुंदा (९९६९१४८६५४) किंवा डॉ. गीताली (९८२२७४६६६३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purushbhan parishad
First published on: 23-05-2015 at 03:25 IST