‘आव्वाज कुणाचा’.. ‘थ्री चिअर्स फॉर’.. अशा घोषणांच्या निनादामध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या जल्लोषाला प्रारंभ झाला. युवा रंगकर्मीच्या सळसळत्या उत्साहाने भरत नाटय़ मंदिर परिसर दणाणून गेला होता.
महाविद्यालयीन युवकांच्या कलागुणांना रंगमंच उपलब्ध करून देत त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस रविवारपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ५१ वे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांच्या ५१ संघांनी सहभाग घेतला आहे. ३० ऑगस्टपर्यंत प्राथमिक फेरी रंगणार आहे. अंजली धारू, राहुल देशपांडे आणि मििलद जोगळेकर हे प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहात आहेत.
मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअिरगच्या ‘वाटसरू’ या एकांकिकेने या स्पर्धेची सुरुवात झाली. त्यानंतर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची ‘ती पहिली रात्र’ आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची ‘गाव चोरांचं’ या दोन एकांकिका रविवारी सादर झाल्या. गरज नसताना नेपथ्य आणि संगीताचा अतिवापर करणाऱ्या संघांना या वर्षीपासून नकारात्मक गुण देण्यात येणार आहेत. त्याची पूर्वकल्पना स्पर्धक संघांना देण्यात आली असल्यामुळे पहिल्या दिवशी सादर झालेल्या तीन एकांकिकांमध्ये या बाबींवर कटाक्षाने लक्ष देण्यात आले असल्याचे पाहण्यास मिळाले.
सुमार संघांचीही निवड
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या ५१ एकांकिकांमधून अंतिम फेरीसाठी ९ एकांकिकांची निवड केली जाणार आहे. यंदापासून एक नवी पद्धती अमलात येणार आहे. त्यानुसार या फेरीतून सुमार एकांकिका सादर करणाऱ्या १० संघांचीही निवड केली जाणार आहे. या महाविद्यालयांना पुढील वर्षी थेट स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्व स्पर्धक संघ पूर्ण तयारीनिशी उतरतील आणि स्पर्धेचा दर्जादेखील राखला जाईल, अशी अपेक्षा महाराष्ट्र कलोपासक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.