अमरावती येथील डॉक्टरच्या नावाने पुण्यात गेल्या आठ वर्षांपासून वैद्यकीय प्रॅक्टीस करणाऱ्या तोतया डॉक्टरला डेक्कन पोलिसांनी शिरूर येथे शनिवारी पहाटे अटक केली. या तोतया डॉक्टरने प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी फिटनेस प्रमाणपत्र, बनावट मृत्युपत्र, तसेच शासकीय डॉक्टरांच्या पॅनेलवर काम केल्याचे तपासात समोर आले आहे.
परमेश्वर महादेवराव दंदे (वय ४३, रा. श्रद्धा हिरीटेज, मोरवाडी, िपपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंदे हा मूळचा अमरावतीचा असून गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात डॉ. चेतन देऊळकर यांच्या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. डॉ. देऊळकर आणि आरोपी हे वर्गमित्र आहेत. दंदे हा पुण्यात आल्यानंतर एलआयसीचा एजंट म्हणून काम करीत होता. पण, त्यातून पैसे मिळेनासे झाल्यानंतर त्याने डॉ. देऊळकर यांच्या नावाने फिटनेस प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. त्यानंतर बनावट मृत्यू प्रमाणपत्र देण्यासही सुरुवात केली. याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या.
डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शंभर पेक्षा जास्त आरोपींना पकडणारे महेश निंबाळकर यांनी दोन दिवसांपासून या तोतया डॉक्टरचा शोध सुरू केला होता. तो अमरावती येथे असल्याची माहिती निंबाळकर यांना खबऱ्याकडून मिळाली होती. तो सतत ठिकाणे बदल होता. तो शिरूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे आणि पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत निंबाळकर, यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पुणे, राजकुमार पाटील, सुदेश सपकाळ यांनी सहभाग घेतला.