कॅनव्हासवर रेखाटली जाणारी चित्रं बघून मुलांमध्ये उल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलं एकाग्रतेने कॅनव्हासवर रेखाटली जाणारी चित्रं बघत होती आणि आनंदाने टाळ्या पिटत होती. वंचित विकासतर्फे दिला जाणारा ‘रानवारा कृतज्ञता’ पुरस्कार चित्रकार घनश्याम देशमुख यांना नुकताच देण्यात आला.
त्यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण चित्रांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी मारलेल्या छोटय़ा-मोठय़ा, वाकडय़ा-आडव्या रेषांमधून श्री. देशमुख यांनी वेगवेगळे चेहरे तर काढलेच; त्याचबरोबर शून्यातून सहजपणे खूप सारे चेहरे रेखाटले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिध्द कवयित्री संगीता बर्वे, तर अध्यक्ष्यस्थानी होते प्रसिद्ध चित्रकार अनिल उपळेकर. त्यांच्या उपस्थितीत सानिया व आभा या दोन छोटय़ा मुलींच्या हस्ते देशमुख यांना या वर्षीचा ‘रानवारा कृतज्ञता पुरस्कार’ देण्यात आला. प्रमुख पाहुण्या संगीता बर्वे यांनी त्यांच्या बालकविता म्हणून दाखवल्या. अनिल उपळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात मुलांच्या लेखन, चित्रांसाठी मुलांना दिला जाणारा ‘कै. इंदिरा गोविंद पुरस्कार’ देखील पाहुण्यांच्या हस्ते या वेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ‘निर्मळ रानवारा’ मासिकाच्या संपादिका ज्योती जोशी यांनी केले.