शहरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच दत्तवाडी पोलीस स्टेशन परिसरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने बारा जणांना चावण्याचा, तसेच त्यातील काही जण जखमी झाल्याचा प्रकार गुरुवारी घडला.
शाहू महाविद्यालयाजवळील शाहू वसाहत भागात हा प्रकार घडल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पोमण यांनी दिली. शाहू वसाहत व परिसरात हे कुत्रे चावण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी दोन ते रात्री नऊ पर्यंत सुरू होता. त्यात अडीच वर्षांच्या एका मुलीसह काही ज्येष्ठ महिलांनाही हे कुत्रे चावले. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना त्यांनी चावे घेतले. तसेच काही नागरिकांना जखमीही केले. एका महिलेच्या हाताला या प्रकारात मोठी दुखापत झाली.
हा प्रकार समजल्यानंतर त्या कुत्र्याला पकडण्याचा कार्यकर्त्यांनी तसेच काही स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केला. कार्यकर्ते पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेत असताना अखेर रात्री ते जवळच एका ठिकाणी आढळून आले. ते पिसाळलेले असल्यामुळे नागरिकांवर सतत धावून जात होते. तसेच ते अनेकांना चावत असल्यामुळे ते सापडताच त्याला मारण्यात आले.
लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, पर्वती, तसेच या भागातील पाण्याच्या टाकीजवळ अनेक मोकाट कुत्री दिवसा आणि रात्रीही मोठय़ा संख्येने हिंडत असतात. त्यांचा पादचाऱ्यांना तसेच दुचाकीवरून जाणाऱ्यांना सातत्याने उपद्रव होत असून ज्येष्ठ नागरिकांनाही या कुत्र्यांनी भंडावून सोडले आहे. भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे अनेकांना या भागात पायी चालणे अवघड झाले असून तेथून पायी जाणे अशक्य होऊन जाते, अशी परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेकडे या बाबत नागरिक सातत्याने तक्रारी करत असले, तरी त्यांची दखल घेतली जात नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.  सन २०१२-१३ या वर्षांत शहरात १२,७३१ जणांना कुत्रे चावण्याचे प्रकार घडले, तर सन १३-१४ मध्ये ही संख्या ७,५७२ इतकी असल्याचे सांगण्यात आले. सन १२-१३ मध्ये शहरात १०,७९७ भटकी कुत्री पकडण्यात आली, तसेच सन १३-१४ मधील ही संख्या ३,०२० इतकी आहे.