ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, नेतेमंडळी तसंच सर्वसामान्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्यावर आज पुण्यातल्या वैंकुठ स्मशानभूमी इथं विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल बजाज यांचं पार्थिव त्यांच्या पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी आणण्यात आलं होतं. तिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बजाज यांचे मित्र शरद पवार हे देखील उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनीही बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे कामगारांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर कामगार आले होते. तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी देखील अंत्यदर्शन घेतलं. छगन भुजबळ, रघुनाथ माशेलकर, दिलीप वळसे पाटील आदींनी राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तर अंत्यसंस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि बाबा रामदेव हे देखील उपस्थित होते.

राहुल बजाज यांच्या निधनावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया –

“राहुल बजाज हे एक गांधीवादी परंपरा माननारे व्यक्ती होते. मी त्यांना गेल्या १८ वर्षांपासून ओळखतो. ते खूप चांगले व्यक्ती होते. प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे उच्च विचार ते मांडायचे, ते कुणालाच घाबरायचे. त्यांच्या निधनाने फक्त उद्योग जगताचीच नाही तर देशाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो,” असं बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

राहुल बजाज आमच्यासाठी देव; कामगारांनी व्यक्त केल्या भावना

राहुल बजाज हे आमच्यासाठी देव होते. त्यांनी आम्हाला जगण्याची नवी उमेद दिली. लाखो कुटुंब उभी केली आहेत. असं म्हणत कामगार भावनिक झाले तर काही जणांना अश्रू अनावर झाले. राहुल बजाज यांच्या जाण्याने कामगारांवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कामगार त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आले आहेत.