लुटमार, पाकीटमारी, मारहाण त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याऱ्या विविध घटना रेल्वे गाडय़ांमध्ये सातत्याने होत असताना या घटनांची तातडीने माहिती देऊन गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने रेल्वेने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मागील काही दिवसांपासून प्रवाशांची लुटमार करण्याच्या घटना घडत आहेत. स्थानकाच्या परिसरात उगाचच भांडण काढून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे-दौंड या पट्टय़ामध्ये लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये रात्रीच्या वेळेला प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासन व पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, घटना घडत असताना किंवा घडण्याची शक्यता असताना संबंधित ठिकाणी तातडीने सुरक्षा यंत्रणेशी संपर्क होईलच असे नाही. त्यामुळे रेल्वेने देशपातळीवर १८२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे.
गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच रेल्वेतील सुरक्षेबाबतच्या तक्रारीही प्रवाशांना या हेल्पलाईन क्रमांकावर सांगता येणार आहेत. प्रवासादरम्यान एखादी घटना घडत असताना त्यांची माहिती हेल्पलाईन क्रमांकावर दिल्यास या यंत्रणेकडून तातडीने जवळील स्थानकाला याबाबत माहिती देऊन पुढील उपाययोजना केल्या जातात. चालत्या रेल्वेमध्ये मोबाईलच्या माध्यमातून या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करता येणे शक्य आहे. महिलांची छेडछाड किंवा महिलांच्या डब्यामध्ये अनधिकृतपणे शिरलेल्या पुरुषाबाबतही या क्रमांकावरून तक्रार करता येणार आहे.
सुरक्षेबाबतच्या तक्रारींबरोबरच प्रवासाच्या दरम्यान होणारी असुविधा, रेल्वे आरक्षण, रेल्वेगाडय़ा व फलाटावरील अस्वच्छता आदींबाबत तक्रार किंवा सूचना करण्यासाठी १३८ हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबरच रेल्वेबाबत माहिती घेण्यासाठी १३९ हा हेल्पलाईन क्रमांकही सुरू असल्याचे रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे. चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने या सुविधेचा प्रवाशांनी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.