फुकटय़ांना आळा घालण्यासाठी रेल्वेचा अचानक तपासणीचा फंडा

फुकटय़ा प्रवाशांना आळा घालण्यासाठी अचानक तपासणीचा फंडा रेल्वेकडून वापरला जात आहे. पुणे-दौंड मार्गावर दोनच दिवसांपूर्वी अशा प्रकारची तपासणी झाली.

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मागील काही महिन्यांपासून फुकटय़ा प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाढलेली संख्या लक्षात घेता तिकीट तपासनिसांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे विभागांतर्गत धावणाऱ्या गाडय़ांमध्ये नियमित तपासणी होत नसल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत फुकटय़ा प्रवाशांना आळा घालण्यासाठी अचानक तपासणीचा फंडा रेल्वेकडून वापरला जात आहे. पुणे-दौंड मार्गावर दोनच दिवसांपूर्वी अशा प्रकारची तपासणी झाली.
पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या व विभागांतर्गत गाडय़ांची संख्या कमी असताना पुणे-लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकल त्याचप्रमाणे पुणे-दौंड, बारामती मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाडय़ांमध्ये तिकीट तपासनिसांकडून नियमित तपासणी केली जात होती. विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्याला जागेवर दंड केला जात होता. दंड न भरल्यास शिक्षेचीही तरतूद आहे. केवळ गाडय़ांमध्येच नव्हे, तर महत्त्वाच्या प्रत्येक स्थानकावर गाडीतून बाहेर पडलेल्या प्रवाशाच्या तिकिटांची तपासणी करण्यात येत होती. नियमित तपासणीमुळे फुकटय़ांवर चांगलाच अंकुश होता. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पुणे विभागातून सुटणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढली. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या विविध गाडय़ा पुणे विभागातून सुरू करण्यात आल्या.
वाढलेल्या गाडय़ांच्या प्रमाणात तिकीट तपासनिसांची संख्या मात्र वाढली नाही. त्यामुळे उपलब्ध असणारे तिकीट तपासनीस सध्या केवळ लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीच वापरण्यात येतात. त्यामुळे विभागात धावणाऱ्या पुणे-लोणावळा, दौंड व बारामती या मार्गासाठी तिकीट तपासनीस उपलब्ध होत नाहीत. पुणे स्थानक वगळता इतर महत्त्वाच्या स्थानकातही तिकीट तपासनीस दिसत नाही. त्यामुळे संबंधित मार्गावरील गाडय़ांमध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढण्याबरोबरच फलाटावरही प्रवाशांखेरीज इतरांची गर्दीही वाढत चालली आहे.
तिकीट तपासनिसांची संख्या वाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, फुकटय़ांची संख्या वाढूनही चालणार नाही. त्यामुळे रेल्वेकडून तिकीट तपासणीच्या विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणावर फुकटे सापडत आहेत. या वर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत राबविलेल्या मोहिमेमध्ये ३९ हजार फुकटे प्रवासी पकडण्यात आले. या मोहिमेबरोबरच अचानक तपासणीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. सर्वाधिक गर्दीच्या पुणे-लोणावळा व पुणे-दौंड या मार्गावर ही तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे-दौंड मार्गावर धावणाऱ्या विविध पॅसेंजर गाडय़ांमध्ये अशा प्रकारची तपासणी करण्यात आली. त्यात एकाच दिवशी तीनशेहून अधिक फुकटे प्रवासी सापडले. अशा प्रकारची तपासणी या मार्गावर वेळोवेळी करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Railway ticket checker