जुलैमध्ये राज्यासह देशात सर्वसाधारण पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात आणखी आठवडाभर तरी मोसमी पाऊस जोर धरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण आणि विदर्भातकाही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जुलैमध्ये देशात आणि राज्यातही सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच हंगामाच्या प्रत्येक महिन्यातील पावसाचा स्वतंत्र अंदाज जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी (१ जुलै) हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जुलैमधील अंदाज जाहीर केला. त्यानुसार जुलै महिन्यामध्ये देशात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्याच्या मध्यावर पावसाचे प्रमाण वाढणार आहे.

महाराष्ट्रात कोकण विभागात सर्वत्र जुलैचा पाऊस सर्वसाधारण राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांत बहुतांश ठिकाणी सर्वसाधारण ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असली, तरी काही भागांमध्ये या महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाचा अंदाज आहे. देशाच्या वायव्य भागातील राज्यांसह दक्षिण भारत आणि पूर्व भारताच्या काही भागांत पावसाचे प्रमाण सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी राहणार आहे. मध्य भारतात काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यातील धरणांत २६ टक्केच पाणी

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये २६ टक्केच पाणीसाठा आहे. सर्व धरणांमध्ये गुरुवारी १० हजार ९५८ दलघमी म्हणजे क्षमतेच्या २६.८७ टक्के पाणीसाठा होता. मध्यम धरणांत गेल्या वर्षी १ जुलैला २८ टक्के पाणीसाठा होता. तो आता २१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ६० टक्के अधिक पाऊस झाला. मात्र, हा पाऊस नियमित नव्हता. अनेक दिवस पावसाने ओढ दिली आहे.

हवाभान

  • ’देशाच्या पश्चिम उत्तर भागातील पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत सध्या उष्णतेची लाट आहे.
  • ’दुसरीकडे उत्तर-पूर्व राज्यांत पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील किमान तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
  • ’येत्या चार दिवसांमध्ये राज्यात कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. कोकणात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.