scorecardresearch

राज्यात आज, उद्या पाऊस ; शुक्रवारपासून पुन्हा उष्णतेची लाट

राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.

कोकणातील अनेक भागांत सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली़

पुणे : राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस मात्र २९ एप्रिल ते २ मेपर्यंत उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रावात सक्रिय असल्याने राज्यातील काही भागांत दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागांत २७ आणि २८ एप्रिल रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर जळगाव, नाशिक, नगर या भागांत उष्णतेची लाट तीव्र राहणार आहे.
आगामी पाच दिवसांत २९ एप्रिल ते २ मेदरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार आहे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या २४ तासांत कोकणात जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना व गारांसह पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
ब्रह्मपुरीचा पारा ४४.७ अंशांवर
राज्यात मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४४.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेल़े सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आल़े

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rain state today tomorrow heat wave again friday konkan central maharashtra amy

ताज्या बातम्या